चारा छावण्यांवर आता फौजदारी कारवाईचे संकट

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – चारा छावणी चालकांनी अटीचे पालन न केल्यामुळे दंड आकारले होते. वारंवार दंड आकारून सुधारणा न करणाच्या छावणीचालकांवर फौजदारी कारवाई करण्याच्या विचारात जिल्हा प्रशासन आहे. जिल्ह्यात 460 चारा छावण्या सुरू आहेत. यात 38 हजार 981 लहान व 2 लाख 46 हजार 234 मोठी, अशी एकूण 2 लाख 85 हजार 215 जनावरे आहेत.

शासनाने दिलेल्या नियमावलीनुसार व अटी-शर्तींचे चारा छावण्यांकडून वारंवार उल्लंघन होत आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी अनेक वेळा अचानकपणे चारा छावण्यांना भेटी दिल्या होत्या. त्यात अतिशय अटी व शर्तींचे पालन न केलेल्या चारा छावण्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. छावण्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानातून दंडाची वसुली करण्यात आली.

दंडात्मक कारवाई करूनही काही प्रकारची सुधारणा होत नसल्याने आता चारा छावणीवर फौजदारी कारवाईची संकट उभे राहिले आहे. संबंधित चारा छावण्या बंद करण्याची अथवा छावणी चालवणाऱ्या संस्था चालकांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याच्या विचारात प्रशासन आहे. त्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. शिर्डी मतदारसंघातील निवडणूक आटोपताच जिल्हा प्रशासनाकडून चारा छावण्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.