आता ‘पालकमंत्री’ पदावरुन ‘नाराजी’नाट्य !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  उद्धव ठाकरे यांच्या तीन पक्षांच्या सरकारमध्ये कोणत्या पक्षाला किती मंत्रीपदे यावरुन सुरुवातीला घोळ सुरु होता. त्यानंतर कोणाला मंत्री करावे यावरुन नाट्य रंगले. त्यानंतर कोणाला कोणता बंगला मिळावा, यावरुनही या मंत्र्यांनी घोळ घातले. त्यामुळे सरकार अस्तीत्वात येऊन एक महिना होऊ गेले तरी सरकार प्रत्यक्ष कामाला लागलेले दिसत नाही. आता पालकमंत्र्यांची घोषणा झाल्यानंतर या मंत्र्यांचे पुन्हा एकदा नाराजीनाट्य सुरु झाले आहे.

अहमदनगरचे काँग्रेसचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांना कोल्हापूचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. तर, कोल्हापूरच्या हसन मुश्रीफ यांच्याकडे अहमदनगरचे पालकमंत्री देण्यात आले आहे. त्यामुळे खुद्द बाळासाहेब थोरात यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीचे मुश्रीफ आणि काँग्रेसचे सतेज पाटील यांच्यात चुरस होती. त्यामुळे दोघांच्या मारामारीत तिसऱ्याच म्हणजे थोरात यांच्याकडे पालकमंत्रीपद देण्यात आले. तर सतेज पाटील यांना थेट भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.

पालकमंत्र्यांच्या यादीत शिवसेनेकडे १३, राष्ट्रवादी काँग्रेसकडे १२ आणि काँग्रेसकडे ११ जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद आले आहे. ज्या जिल्ह्यात ज्यांच्या जागा जास्त त्या पक्षाकडे पालकमंत्रीपद असे सुत्र ठरविण्यात आले आहे. त्यानुसारच एखाद्या जिल्ह्यात एका पक्षाचा वजनदार नेता असला तरी त्या जिल्ह्यात दुसऱ्या पक्षाचे आमदार जास्त असल्याने पालकमंत्रीपद दुसऱ्या पक्षाकडे गेले आहे. अहमदनगरसह अनेक जिल्ह्यांमध्ये असा प्रकार झाला आहे. त्यातून आता पालकमंत्री नाराजीनाट्य रंगू लागले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातही असाच प्रकार समोर आला आहे़ औरंगाबादचे पालकमंत्रीपद शिवसेनेचे सुभाष देसाई यांच्याकडे देण्यात आले आहे. त्याचवेळी मंत्रीपदावरुन नाराज असलेल्या औरंगाबादच्या अब्दुल सत्तार यांना धुळे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद बाळासाहेब पाटील यांच्याकडे देण्यात आले तर साता ऱ्याचे मंत्री शंभुराजे देसाई यांना थेट वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.

पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आल्याने पुण्यातील दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सोलापूरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या पालकमंत्रीपदामध्ये सर्वात सुदैवी एकनाथ शिंदे ठरले आहेत. त्यांच्याकडे ठाणे आणि गडचिरोली अशा दोन जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दोन जिल्ह्याची जबाबदारी असणारे हे एकमेव मंत्री आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/