आता चाळीतील पोलिसांना मिळणार टॉवरमधील घरं !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आता लवकरच 22 मजली टॉवरमधील मॉडर्न घरं पुणेकरांच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या पुणे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत. पर्सिस्टंट फाऊंडेशनकडून अत्याधुनिक सोई सुविधांनी युक्त गगनचुंबी इमारत उभारण्यात आली आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर त्यात पोलिसांचा गृहप्रवेश होण्याची शक्यता आहे.

ब्रिटीशकालीन चाळी आणि स्वातंत्र्योत्तर काळात उभारलेल्या पोलीस वसाहतीमधील इमारतीत पोलीस कर्मचारी वर्षानुवर्षे वास्तव्य करत आहेत. गळणारं छत, पापुद्रे निघणाऱ्या भिंती, घुशी आणि उंदरांचा सुळसुळाट झालेली स्वच्छतागृहे, पाण्याचा कायमच अभाव अशा वातावरणात कुटुबासह राहून शहराच्या सुरक्षेची जबाबदारी पोलीस कर्मचारी पार पाडत असतात. अनेकदा चांगल्या घरांसाठी, पाण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ पोलीसाच्या कुटुंबीयांवर येते. या साऱ्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर पोलीस वसाहतीत बहुमजली इमारत बांधण्याचं काम राज्य सरकारनं निश्चित केलं. तत्कालीन आमदार विजय काळे यांच्या पुढाकारानं व पर्सिस्टंट फाऊंडेशनच्या प्रयत्नातून 22 मजल्यांचे दोन निवासी टॉवर बांधण्याचं काम ऑक्टोबर 2018 मध्ये सुरू झालं.

याबाबत बोलताना माजी आमदार विजय काळे म्हणाले, पोलिसांसाठी चांगली घरं उपलब्ध व्हावीत यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर पर्सिस्टंट फाऊंडेशननं या प्रकल्पाचं बांधकाम करून ते हस्तांतरीत करण्याचं मान्य केलं. त्यानुसार हा प्रकल्प पूर्णत्वास येत आहे.

अतिरीक्त पोलीस आयु्क्त (प्रशासन) डॉ. जालिंदर सुपेकर यांनी सांगितलं की, प्रकल्पाचं काम येत्या 2 महिन्यात पूर्ण होणार असून त्यानंतर ते पोलीस कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध होऊ शकतील.

असं आहे घर

– 2 टॉवर
– 168 घरं
– 550 चौ. फू. घराचं क्षेत्रफळ

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितलं की, शिवाजीनगर येथील पोलिसांच्या निवासी टॉवरचं काम पर्सिस्टंट फाऊंडेशन व दादा देशपांडे यांनी केलं आहे. त्यांनी पुणे पोलिसांच्या गृहनिर्माणासाठी या प्रकल्पाद्वारे मोठं योगदान दिलं आहे. काही दिवसातच इमारतीचं काम पूर्ण होईल.

पोलीस अधिकाऱ्यांनाही नसतील अशी घरं पोलीस कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत असं पर्सिस्टंट फाऊंडेशनचे व्यवस्थापक गणेश वाबळे यांनी सांगितलं.