फायद्याची गोष्ट ! आता ‘या’ सरकारी बँकेनं केली व्याज दरात ‘कपात’, गृह अन् वाहन कर्ज झालं ‘स्वस्त’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) रेपो दर कमी केल्याने याचा फायदा आता सर्वसामान्यांना मिळू लागला आहे. अलीकडेच स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी बँक यांनी व्याज दरात कपात केल्यानंतर इतर बँकांनीही आकर्षक व्याजदरावर कर्ज देणे सुरू केले आहे. याच पार्श्वभूमीवर आता युको बँकेने देखील ग्राहकांना अगदी कमी व्याजदराने कर्ज देण्याचे जाहीर केले आहे.

6.90 टक्क्यांवर मिळेल कर्ज
देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँक म्हणजेच यूको बँक (UCO bank) ने गृह आणि कार लोन स्वस्त केले आहे. बँकेने रेपो दर आधारित कर्जाच्या व्याजदरात 0.40 टक्के कपात केली असून ते 6.90 टक्क्यांवर आणले आहे. रिझर्व्ह बँकेने नुकतेच रेपो दरात कपात केल्यामुळे ग्राहकांना याचा फायदा व्हावा यासाठी बँकेचे हे एक पाऊल आहे. बँकेने म्हटले की या कपातीसह बँकेचे किरकोळ व एमएसएमई कर्जही 0.40 टक्के स्वस्त होईल. तथापि, बँकेने ठेवींच्या दरात बदल केल्याची माहिती दिली नाही.

विशेष म्हणजे लॉकडाऊन सुरु झाल्यापासून सरकारला वाटत आहे की देशात आर्थिक मंदी येऊ शकते. यामुळेच आरबीआयने अनेक नवीन घोषणा केल्या आहेत. बँकांना जास्तीत जास्त तरलता मिळावी अशी सरकारची इच्छा आहे. जेणेकरून सर्वसामान्यांना कमी व्याज देऊन अधिक पैसे देता येतील. त्याचबरोबर जनतेला जर सहजरित्या पैसे उपलब्ध होत असतील तर आर्थिक कामेही सुरळीत ठेवता येतील.