खुशखबर ! आता अशिक्षीत ड्रायव्हर देखील काढू शकतात व्यावसायिक परवाना, ‘DL’च्या नियमांत बदल, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्यावसायिक वाहन चालवणाऱ्या चालकांसाठी मोठी खुशखबर आहे. आता तुम्हाला या वाहनांचा चालक परवाना काढायचा असल्यास किमान आठवीपर्यंत शिक्षणाची अट संपुष्टात आली आहे. रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने नवीन नियमांमध्ये बदल केले असून आता कमी शिक्षण असलेल्या व्यक्ती देखील वाहन परवाना काढू शकतात. तसेच जुना परवाना रिन्यू देखील करू शकतात. हा नवीन नियम तात्काळ लागू करण्यात आला असून यामुळे अनेक वाहनधारक आणि इच्छुक व्यक्तींना दिलासा मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,परिवहन विभागाने नियमांमध्ये बदल केले असून अशा प्रकारची कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही. यासाठी परिवहन विभागाने जून 2019 मध्ये ड्राफ्ट तयार केला होता. त्यानंतर त्याला मंजुरी मिळाल्यानंतर आता त्याचे कायद्यात रूपांतर करण्यात आले आहे. यामध्ये विविध नागरिकांच्या सल्ल्यानुसार आणि गरजेनुसार बदल करण्यात आल्याचे देखील सांगितले आहे. ज्या व्यक्तींचे अजिबात शिक्षण झाले नव्हते त्यांना या अटीमुळे वाहन परवाना तयार करता येत नव्हता, मात्र आता या नियमांमुळे सर्वांना याचा मोठा फायदा होणार आहे.

रस्ते सुरक्षा नियमांबद्दल तडजोड नाही
काढण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार अशिक्षीत चालकांसाठी शिक्षणाची अट काढून टाकण्यात आली आहे. मात्र, रस्ते सुरक्षा नियमांबद्दल कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अशिक्षीत लोकांना प्रशिक्षण देवून रस्ते सुरक्षा नियमांबद्दल सांगण्यात येणार आहे. आत्‍तापर्यंत दिल्‍लीच्या सर्वच्या सर्व आरटीओ कार्यालयामध्ये तसं राजपत्र पाठविण्यात आलं असून त्यास तात्काळ लागू करण्यासाठी सांगण्यात आले आहे.

परिवहन विभागातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता व्यावसायिक परवाना काढणार्‍यांच्या संख्येत कमालीची वाढ होणार आहे. यापुर्वी सर्व आरटीओ कार्यालयात अशिक्षीत लोक वाहन परवाना काढण्यासाठी येत होते मात्र त्यांना शिक्षणाची सांगितल्यानंतर ते परत जात होते. आता सर्व चालकांना परवाना देण्यासाठी सर्व आरटीओ कार्यालयांनी तयारी सुरू केली आहे.

Visit : policenama.com