उत्तरप्रदेशमध्ये भाजपला मोठा धक्का ?; एनडीएतील ‘हा’ साथीदार साथ सोडण्याच्या तयारीत

लखनौ : वृत्तसंस्था – भाजपाचा एनडीएतील साथीदार भाजपाची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपासोबत आघाडी असलेल्या अपना दलच्या नेत्या अनुप्रिया पटेल यांनी एनडीए सोडण्याचा इशारा दिला आहे. लोकसभा निवडणुकांपूर्वी मित्रपक्षांना जोडण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरु आहेत अशातच अनुप्रिया पटेल यांनी एनडीए सोडण्याचा इशारा दिला आहे.

राष्ट्रवादीच्या सभेत राडा ; शरद पवारांना गुंडाळावे लागले भाषण  

एका वृत्तवाहिनीशी बोलताना अनुप्रिया पटेल म्हणाल्या की, “भाजपाला आपल्या मित्रपक्षांना सांभाळून घेता येत नाही. अपना दलने  भाजपाला 20 फेब्रुवारीपर्यंत आपल्या तक्रारीचे निराकरण करण्यास सांगितले होते.  मात्र भाजपाने आमच्या तक्रारींचे निवारण केलेले नाही. त्यामुळे आता अपना दल आपला निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहे. आता 28 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बैठकीत आम्ही पुढील निर्णय घेऊ.”

यावेळी बोलताना  लोकसभा निवडणुकीत राम मंदिर हा मुद्दा बनेल का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.  या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, “मला वाटत नाही की राम मंदिर हा निवडणुकीचा मुद्दा बनेल. तसेच आगामी निवडणुकीत कुणाचे तिकीट कापायचे आणि कुणाला उमेदवारी द्यायची हा पूर्णपणे भाजपाचा अंतर्गत निर्णय असेल.” असे म्हणत अनुप्रिया यांनी भाजपाने दिलेली आश्वासने आणि राम मंदिराच्या मुद्द्यावर भाष्य करण्यास टाळलं.

अपना दल हा उत्तर प्रदेशातील भाजपाचा मित्रपक्ष आहे. अनुप्रिया पटेल यांना केंद्रामध्ये अपना दलच्या कोट्यातून मंत्रिपद देण्यात आले आहे. गेल्या काही काळापासून अपना दल भाजपावर नाराज आहे.