शिवप्रेमीचा पराक्रम ; 17 लाख रुपये खर्चून हिंजवडीत उभारला प्रतापगड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांचे महत्त्वाचे स्थान आहेत. त्यांच्या या धगधगत्या इतिहासाचे आजचे साक्षीदार म्हणजे महाराष्ट्रातले गड-किल्लेच. महाराष्ट्रात त्यांच्या या गड-किल्ल्यांचेही विशेष स्थान आहे. त्यातीलच किल्ले प्रतापगड  सर्वांच्याच माहितीचा असेल. इतिहासात या किल्ल्याचेही वेगळे महत्त्व आहे. सातारा जिल्ह्यात असलेला हा किल्ला पाहण्यासाठी पर्यटकही लांबून येतात.

प्रतापगडाची सफर ही पुण्यातही करता येणार आहे. हिंजवडीमध्ये, एका शिवप्रेमी तरुणाने किल्ले प्रतापगडाची हुबेहुब प्रतिकृती साकारली आहे. त्यामुळे इथेच तुम्हाला प्रतापगडची अनुभूती घेता येणार आहे. धनंजय बर्वे असं या शिवप्रेमीचं नाव आहे. ही प्रतीकृती प्रतापगडाच्या लौकिकाला साजेशी आहे. सुमारे अडीच एकरात प्रतापगडची ही प्रतिकृती उभारण्यात आली आहे. ही प्रतिकृती उभारण्यासाठी तब्बल 16 ते 17 लाख रुपये खर्च आला आहे.

हिंजवडी आयटीपार्क म्हणून देशात प्रसिद्ध आहेच. त्यामुळे हिंजवडीत जगभरातून अनेक इंजिनियर कामानिमित्त येत असतात. त्यांना छत्रपती शिवरायांचे कौशल्य, त्यांचा पराक्रम आणि त्यांचा इतिहास माहित व्हावा, हा उद्देश ही प्रतिकृती साकारण्यामागे होता, असं धनंजय बर्वे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शिवप्रेमींना प्रतापगडचे वेगळे महत्त्व सांगण्याची गरज नाही. हा प्रतापगड म्हणजे तोच, ज्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांना गदा देणाऱ्या अफजल खानाचा वध केला होता. त्यामुळे प्रतापगडाचे इतिहासात विशेष महत्त्व आहे.