आता व्हॉट्सअ‍ॅप वेबवरही पाहता येणार पिक्चर-इन-पिक्चर मोड

मुंबई: वृत्तसंस्था – जगभरातील लोकांच्या सर्वाधिक पसंतीचे मानले जाणारे सोशल मीडिया अप्लिकेशन म्हणजे व्हाट्सअ‍ॅप. व्हाट्सअ‍ॅप हे लोकांना आहेत त्या सुविधांपेक्षा अधिक सुविधा देण्यासाठी आणि युजर फ्रेंडली होण्यासाठी नेहमी नवनवीन अपडेट्स फिचर घेऊन येतं असतं. काही दिवसांपुर्वीचे व्हाट्सअ‍ॅपने एक नवीन फीचर आणल होतं.

यामध्ये ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्यापूर्वी परवानगी घेणे बंधनकारक होते आणि आता पुन्हा एकदा एक नवीन फीचर व्हाट्सअ‍ॅपने आणलं आहे. ते म्हणजे ‘पिक्चर-इन-पिक्चर’ (PIP) हे फीचर व्हाट्सअ‍ॅप वेबवरही उपलब्ध करुन दिलं आहे. या फीचरच्या माध्यमातून व्हाट्सअ‍ॅप युजर्स चॅट विंडोमध्येच व्हिडिओ देखील प्ले करु शकतात. म्हणजेच, व्हाट्सअ‍ॅपवर एखाद्याशी बोलत असतांना तुम्हाला व्हिडिओ देखील पाहायचा असल्यास तुम्हाला चॅट विंडोमधून बाहेर येण्याची आवश्यकता नाही. व्हॉट्सअ‍ॅपच्या आगामी फिचर्सबाबत अगदी अचूकपणे भाकीत करणार्‍या Wa Beta Info या संकेतस्थळाने याबाबत माहिती दिली आहे.

काय आहे पिक्चर-इन-पिक्चर मोड ?

याच्या माध्यमातून आता कुणीही युट्युबसह अन्य संकेतस्थळांवरील व्हिडीओ पाहतांना त्या अ‍ॅपवर रिडायरेक्ट होण्याऐवजी व्हॉट्सअ‍ॅपच्या इंटरफेसवरच व्हिडीओ पाहू शकतो. यामुळे व्हिडीओ तात्काळ लोड होतो. यात फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यू – ट्यूब व्हिडिओला देखिल सपोर्ट करणारा पर्याय देण्यात आला आहे. आतापर्यंत व्हाट्सअ‍ॅप वेबवर येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी एक मोठी विंडो ओपन होत होती, त्यामध्ये व्हिडिओ प्ले होत होता.

मात्र आता हे फीचर आल्यानंतर व्हाट्सअ‍ॅपवर येणारा प्रत्येक व्हिडिओ हा वेगवेगळ्या बॉक्समध्ये ओपन होणार असून हा व्हिडिओ पाहतांना तुम्हाला चॅटिंग देखील करता येऊ शकते. गेल्या काही दिवसांपूर्वी याबाबद चाचणी करण्यात आली असून .आता ही सुविधा सर्वांसाठी उपलब्ध करण्यात अली आहे.