‘अब तो कफन का सामान भी बदल गया’ मालेगावच्या वृध्दाची व्यथा

नाशिक  : पोलीसनामा ऑनलाइन –  सध्या देशात कोरोनाने थैमान घातला आहे. देशातील ४० टक्के रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रात आहे.  नाशिक मधील मालेगाव मधील परिस्थिती अशीच भयावह होत चालली आहे.

मालेगाव मध्ये आत्तापर्यन्त कोरोनाने १५ बळी घेतले शिवाय लॉकडाऊन मुळे वेळीच योग्य उपचार मिळण्यास अडथळे आल्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, इतर विकार यांवर उपचार न मिळाल्याने आतापर्यंत सहाशेपेक्षा अधिक ज्येष्ठांनी प्राण गमावले आहेत. त्यामुळे जेष्ठ नागरिक धास्तावले आहेत, नेमकं आम्ही जगायचं कसं असा प्रश्न सध्या जेष्ठ करताना दिसत आहेत . लॉकडाऊनमुळे दफनविधी साठी लागणारे सामान सुद्धा सहजासहजी उपलब्ध न झाल्याने विधी देखील नीट होत नसल्याची खंत अनेक जण व्यक्त करीत आहेत.

दफनविधीसाठी लागणारे लाकडी फळी , बांबू चटई, टेरिकॉट कापड आदी साहित्य मिळेनासे झाल्याचे हिलाल कफन सेंटरचे मोहंमद फकरुद्दीन यांनी सांगितले. त्यामुळे बांबू चटईऐवजी प्लॅस्टिक, टेरिकॉटच्या सफेद कापडाऐवजी यंत्रमागावरील स्थानिक ग्रे, पिवळसर कापड वापरले जात आहे. बरगा कमी पडत असल्याने काही वखारी सुरू करण्यास संमती द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मात्र, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.

मालेगाव शहरात गेल्या चार दिवसांत ऐंशीपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याची नोंद कब्रस्तानात करण्यात आली आहे. २०१९ च्या एप्रिलमध्ये बडा कब्रस्तानात फक्त १४० दफनविधी झाले होते, तर यंदा २८ एप्रिलपर्यंतच हा आकडा ४५९ पर्यंत पोचला आहे. मृतांच्या संख्येत झालेली तिप्पट वाढ चिंताजनक आहे. यात ८५ टक्के वृद्धांचा समावेश आहे. याबाबत ज्येष्ठ नगरसेवक युनूस इसा म्हणाले, की माझ्या मुलांना म्हणजेच, स्थायी समितीचे सभापती डॉ. खालीद परवेज, नगरसेवक मालिक आणि माजीद यांना विविध भागातील ज्येष्ठांच्या कुटुंबीयांचे मदत वआणि उपचारासाठी दूरध्वनी आले. काहींना सहकार्य करू शकलो. खासगी रुग्णालये बंद असल्याने अनेकांनी प्राण गमावले. उपचार मिळाले असते, तर यातील काही वाचू शकले असते. तरीदेखील ज्येष्ठांनी संयम बाळगावा. घाबरू नये, असे सांगितले

एकंदरीतच मालेगाव मधील परिसस्थिती चिंताजनक होत चालली आहे.