जाता-जाता देखील करता येणार FASTag रिचार्ज, ग्राहकांना मिळणार ‘ही’ सुविधा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 15 डिसेंबरपासून नॅशनल हायवे वरील टोल नाक्यावर फास्टॅग अनिवार्य करण्यात आलेले आहे. नवीन नियमाप्रमाणे आता प्रत्येक छोट्या किंवा मोठ्या वाहनावर फास्टॅग लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानंतर आता एनपीसीआय ग्राहकांना फास्टॅगला रिचार्ज करण्यासाठी भीम UPI चा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

या सुविधेमुळे आता वाहन चालक चालू गाडीमध्ये देखील आपल्या फास्टॅगचे रिचार्ज करू शकणार आहे. त्यामुळे आता टोलनाक्यावर लागणाऱ्या लांबच लांब रांगांपासून आणि गर्दीपासून सुटका होणार आहे.

एनपीसीआयच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) प्रवीणा राय यांनी सांगितले की, ग्राहकांना एनईटीसी फास्टॅगचा चांगला अनुभव प्रदान करणे हे आमचे उद्दीष्ट आहे. आम्हाला विश्वास आहे की, या सुविधेमुळे टोल देयकासाठी ते एक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक माध्यम उपलब्ध करुन देण्यास सक्षम असतील.

1.10 कोटी फास्टॅग
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, विविध विक्री केंद्रे (पीओएस) च्या माध्यमातून सुमारे 1.10 कोटी फास्टॅग जारी करण्यात आले आहेत. दररोज सुमारे दीड ते दोन लाख फास्टॅगची विक्री महामार्ग प्राधिकरणाकडे पाहायला मिळत आहे. एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोजचे टोल कलेक्शन सुमारे 46 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.तसेच फास्टॅग प्रणाली सुरू झाल्याच्या आठ दिवसांच्या आत, फास्टॅगकडून टोल व्यवहाराची संख्या दररोज 24 लाखांवर पोहोचली आहे.

फास्टॅग म्हणजे नेमकं काय ?
डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी देशभरात 500 हून अधिक टोल प्लाझावर फास्टॅग लागू करण्यात आला आहे. आपल्या वाहनाच्या विंडस्क्रीनवर (समोरील काचेवर) फास्टॅग लावावे लागेल. राष्ट्रीय महामार्ग टोल प्लाझावर स्थापित कॅमेरे ते स्कॅन करतात. यानंतर, आपल्या खात्यातून टोलची रक्कम आपोआप वजा केली जाते. यामुळे ग्राहकांना मोठी वाहन गर्दी आणि लांबच लांब लाईन यापासून सुटका मिळते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/