अजित पवारांचे विरोधकांना खुले आव्हान, म्हणाले – ‘सचिन वाझे प्रकरणी माझी चौकशी करा’

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – सचिन वाझे प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांचेही नाव या प्रकरणाशी जोडले जात असल्याने मोठे खळबळ उडाली आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री पवार यांनी गुरुवारी (दि. 8) वाझे प्रकरणी झालेले आऱोप फेटाळून लावले आहेत. या प्रकरणी माझी कोणतीही चौकशी करा, त्याला माझी तयारी आहे, चौकशीत दूध का दूध पानी का पानी होईल, असे खुले आव्हान त्यांनी विरोधकांना दिले आहे. विरोधकांकडून जाणूनबुजून महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही पवार यांनी केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी गुरुवारी पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांच्या उपस्थितीत भाजप नेते कल्याण काळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी पालक मंत्री दत्तात्रय भरणे, आ. संजय शिंदे, दीपक साळुंखे, सुरेश घुले, भगिरथ भालके, उमेश पाटील, उत्तम जानकर आदी उपस्थित होते.

आढीव येथील काळेंच्या फार्महाऊसवर स्नेहभोजनानंतर पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पवार म्हणाले, वाझे या व्यक्तीला मी कधीही भेटलो नाही, त्याच्याशी माझे कधी संभाषण झाले नाही. तरीही त्याने माझे नाव का घेतले हे माहित नाही. माझ्यावरील हा आरोप धादांत खोटा आहे. सध्या अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी करण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यात माझीही चौकशी करावी, असे ते म्हणाले. महाराष्ट्राला जेवढी लस मिळायला पाहिजे होती. तेवढी लस मिळत नाही. बाहेरच्या देशात लस पाठवण्याऐवजी देशातील राज्यांमध्ये मागणीनुसार लस द्यावी. कालच 350 कोटी लसीच वाटप झाले आहे. यात महाराष्ट्राला 7 लाख 50 हजार लसी मिळाल्या आहेत. ठराविक दिवसात लसीकरण संपवायचे आहे. यासाठी शासकीय व वैद्यकीय यंत्रणा कामाला लावल्याचेही उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.