NRC वरून माघार घेतय का सरकार ? PM मोदींच्या भाषणातून मिळतायत ‘संकेत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन (एनआरसी) देशभरात लागू करण्याचा विचार सध्या नरेंद्र मोदी यांनी गुंडाळून ठेवल्याचे दिसत आहे. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी रविवारी रामलीला मैदानातील रॅलीत एनआरसीबाबत जी वक्तव्ये केली त्यातून संकेत मिळतो की, मोदी सरकारने एनआरसीच्या मुद्द्यावर सध्यातरी आपले एक पाऊल मागे घेतले आहे.

भाजपाने लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात एनआरसी देशभरात लागू करण्याचे आश्वासन दिले आहे. भाजपा अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहांसह पक्ष आणि सरकारच्या प्रत्येक मोठ्या व्यक्तीने एनआरसीचा उल्लेख केला आहे. मात्र, यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी दिल्लीच्या रामलीला मैदानात केलेल्या भाषणात स्पष्टीकरण देताना म्हटले की, २०१४ पासून एनआरसी शब्दावर कोणतीही चर्चा झालेली नाही. कोणताही उल्लेख झालेला नाही.

मोदी या भाषणात म्हणाले, एनआरसीवर खोटी माहिती पसरवली जात आहे. हे काँग्रेसच्या काळात तयार केले गेले आहे. तेव्हा झोपला होतात का? आम्ही तर तयार केलेले नाही, संसदेत आले नाही, कॅबिनेटमध्ये आले नाही, ना त्याचे नियम, कायदे तयार करण्यात आले, केवळ अफवा पसरवल्या जात आहेत. मी पूर्वीच सांगितले की याच सत्रात तुम्हाला जमीन आणि घराचा अधिकार देत आहोत. कुणीही धर्म आणि जात विचारत नाही. अशात आम्ही दुसरा कायदा करून तुम्हाला देशातून बाहेर काढत आहोत का? लहान मुलांसारखी वक्तव्य करता, असे म्हणत मोदींनी काँग्रेसवर अफवा पसरविण्याचा आरोप केला.

मोदी म्हणाले, काँग्रेस ओरडून ओरडून सांगत आहे की, कावळा कान चावून उडाला, आणि लोक कावळा शोधू लागले. पहिल्यांदा तुमचा कान तर बघा, कुणी चावला आहे की नाही. प्रथम हे तर पहा एनआरसीवर काही झाले आहे की नाही, खोटं पसरवलं जात आहे. माझे सरकार आल्यानंतर २०१४ पासून एनआरसी शब्दावर कोणतीही चर्चाच झाली नाही. केवळ सुप्रीम कोर्टाने म्हटल्यावर एनआरसी आसामसाठी लागू करावे लागले.

प्रत्यक्षात नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात देशभरात आंदोलने होत आहेत. सर्व विरोधी पक्षांसह लोक रस्त्यावर उतरले आहेत. मोदींच्या सोबत असलेल्या पक्षांनीही आता या कायद्याच्या विरोधात भूमिका घेतली आहे. या पक्षांनी आपल्या राज्यांमध्ये एनआरसी लागू करणार नसल्याचे म्हटले आहे.

गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत नागरिकत्व संशोधन विधेयक सादर करताना म्हटले होते की, एनआरसी लागू करणार. हेच नव्हे, तर अमित शहा यांनी पश्चिम बंगालमध्ये हेदेखील म्हटले होते की, आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की, २०२४ च्या निवडणुकीपूर्वी देशात एनआरसी लागू करून घुसखोरांना बाहेर काढले जाईल. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामलीला मैदानावर केलेले भाषण या उलट असल्याचे दिसत आहे. यावरून सरकारने एक पाऊल मागे घेतल्याचे स्पष्ट होते.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/