आसाम : NRC संयोजक प्रतीक हजेला यांच्याविरोधात 2 FIR !

गुवाहाटी : वृत्तसंस्था – आसाममधील राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या (NRC) अंतिम यादीत विसंगती आढळून आल्याने एनआरसीचे राज्य समन्वयक प्रतीक हजेला यांच्याविरूद्ध दोन एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. एका वकिलाने आणि मुस्लिम विद्यार्थी संघटना अखिल आसाम युवक विद्यार्थी परिषदेने एफआयआर दाखल केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदन मजूमदार यांनी प्रितीक हजेला यांच्याविरूद्ध बुधवारी दिब्रूगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांचे नाव एनआरसीच्या अंतिम यादीत नाही. त्यांनी सर्व कागदपत्रे दिली होती परंतु कर्मचार्‍यांच्या अकार्यक्षमतेमुळे आणि गुन्हेगारी कट रचल्यामुळे त्यांचे नाव एनआरसीच्या यादीमध्ये समाविष्ट झाले नाही असा आरोप मजूमदार यांनी केला आहे.

मंगळवारी विद्यार्थी परिषदेने प्रितीक हजेला यांच्याविरूद्ध गुवाहाटीतील लतासील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी तक्रारीत अंतिम यादीमध्ये हेतुपुरस्सर विसंगती असल्याचा दावा केला आहे. विद्यार्थी संघटनेने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की, “अनेक मूळ रहिवाशांची नावे यादीमध्ये समाविष्ट केली गेली नाहीत आणि एनआरसी राज्य संयोजकांनी हे जाणीवपूर्वक केले आहे. मात्र पोलिसांनी अद्याप दुसर्‍या एफआयआरच्या आधारे गुन्हा दाखल केलेला नाही.

सुप्रीम कोर्टाने हजेला यांना माध्यमांशी बोलण्यास मनाई केली आहे त्यामुळे या प्रकरणाविषयी त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. गुवाहाटीमधील गीतानगर पोलिस ठाण्यात असम पब्लिक वर्क्स (एपीडब्ल्यू) या स्वयंसेवी संस्थेने एनआरसीच्या अंतिम यादीमध्ये घोषित तीन परदेशी लोकांविरूद्ध तिसरी तक्रार दाखल केली आहे.

आसाम एनआरसी प्रकरण –

आसाममधील राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) ची अंतिम यादी 31 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आली. या यादीत एकूण 3 कोटी 11 लाख 21 हजार 4 लोकांचा समावेश करण्यात आला, तर तब्बल 19.06 लाख लोकांना या यादीत स्थान मिळालेले नाही. या यादीवरुन मोठ्या प्रमाणात वाद सुरू आहे. अनेक तर अशी उदाहरणं आहेत की, भाऊ आसामचा नागरीक आहे पण बहिण नाही, आई नागरीक आहे पण मुलगा नाही. यामुळे राजकारण तापलं असून केवळ काँग्रेसच नव्हे तर भाजपानेही या यादीवर सवाल उपस्थित केले आहेत.