पुण्यात ‘कोरोना’ बाधितांची संख्या वाढली, तरीही अ‍ॅक्टिव्ह रुग्णांमध्ये होतेय घट

पुणे : पुण्यात सोमवारी आजवरची सर्वाधिक उच्चांकी ३९९ नवीन कोरोना बाधित आढळून आल्याने शहरात एकच चर्चेचा विषय ठरला. असे असतानाही त्यातही एक दिलासादायक घटना घडताना दिसून येत आहे. दररोज कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असताना अ‍ॅक्टिव्ह रुग्णांमध्ये आश्वासक घट होताना दिसत आहे. २१ ते २५ मे या पाच दिवसात पुणे शहरातील कोरोना बाधितांची संख्या तब्बल १ हजारांनी वाढून ती ५ हजार १८१वर जाऊन पोहचली आहे.

शहरात कोरोना बाधितांची संख्या अधिक असली तरी कोरोनातून बरे होणार्‍याचे प्रमाणही मोठे आहे. सोमवारी १७९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले. आजपर्यंत शहरातील कोरोनामुक्त होणार्‍यांची संख्या आता २ हजार ७३५ इतकी झाली आहे. पुणे शहरात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५ हजार १८१ असली तरी यापैकी अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २ हजार १८२ इतकी आहे. त्यामुळे अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचे प्रमाण आता ६५ टक्क्यांवरुन ४१ टक्क्यांवर आले आहे. पुण्यात आतापर्यंत २८० रुग्णांचा मृत्यु झाला आहे. या रुग्णांपैकी ९० टक्के मृत्यु हे वयोवृद्ध, व्याधीग्रस्त रुग्ण आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या अधिक दिसत असली तरी प्रत्यक्ष अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या मर्यादित आहे.