Coronavirus : राज्यात 24 तासात ‘कोरोना’चे 1576 नवे रुग्ण तर 49 मृत्यू, बधितांचा आकडा 29000 पार

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन –  महाराष्ट्रात कोरोनाचे 1576 नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर कोरोनामुळे 49 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 21 हजार 467 रुग्णांवर उपचार सुरु आहेत तर 6 हजार 564 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत कोरोनाची लगण होऊन महाराष्ट्रात 1068 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. आत्तापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या 29 हजार 100 एवढी झाली आहे. आज (शुक्रवार) 505 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज राज्यात 49 कोरना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात मुंबईतील 34, पुण्यातील 6, अकोला शहर, धुळे आणि कल्याण डोंबिवलीमध्ये प्रत्येकी 2 तर पनवेल, जळगाव आणि औरंगाबाद शहरात प्रत्येकी 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी 29 पुरुष आणि 20 महिलांचा समावेश आहे. यापैकी 60 वर्षे व त्यावरील वयोगटातील 22 रुग्ण, 40-59 वयोगटातील 23 आणि 40 वर्षाखालील चार रुग्णांचा समावेश आहे. एकूण मृतांपैकी 32 जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळून आले आहेत.

सध्या राज्यात 3 लाख 29 हजार 302 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 16 हजार 306 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्य़ंत राज्यातून 6 हजार 564 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या राज्यात 1 हजार 473 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 14167 सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी 58.97 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.