‘नर्स-डॉक्टर’ जोडप्याचा हॉस्पीटलमध्येच पार पडला विवाह, ‘कोरोना’ योद्धयांवर झाला शुभेच्छांचा वर्षाव

लंडन : पोलिसनामा ऑनलाइन – नात्यातील माणसाच्या गोतावळ्यात सर्वांच्या आशीर्वादाने होणाऱ्या लग्नसोहळ्यांचे समीकरण सध्याच्या परिस्थितीमुळे बदललं आहे. मात्र, प्रत्येकाच्या आयुष्यात विवाहसोहळा हा नेहमीसाठी स्मरणात राहणारा असावा अशी इच्छा असते. दरम्यान, जगाला कोरोना संसर्गापासून वाचविण्यासाठी अनेक आरोग्य कर्मचारी फ्रंटलाईनवर काम करताना दिसत आहे. लॉकडाऊन काळात त्यांच्या कहाण्या दररोज समोर येत आहे. अशीच एक कहाणी आहे डॉ. अन्नालान नवरत्नम (Annalan Navaratnam) आणि नर्स असणाऱ्या जॅन टिपिंग (Jann Tipping) या नवदाम्पत्याची. ज्या रुग्णालयात हे दोघे नागरिकांना कोरोना संसर्गपासून वाचविण्यासाठी फ्रंटलाईनवर काम करत होते. तेथील रुग्णालयातच या दोघांनी विवाह केला. लंडन येथील ‘St Thomas’ रुग्णालयाच्या चर्च मध्ये हा आगळावेगळा विवाह सोहळा पार पडला. तसेच आपल्या आप्तजनांना हा विवाह सोहळा पाहता यावा यासाठी त्याचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आलं होत.

या नवदाम्पत्याचं लग्न ठरल्यानुसार ऑगस्ट महिन्यात होणार होत. परंतु, सध्याची बिकट परिस्थिती पाहता त्यांच्या कुटुंबियांना त्याठिकाणी पोहचणे शक्य नव्हते. मुलाचे कुटुंबीय श्रीलंकेतून तर वधूचे कुटुंबीय उत्तर आयर्लंड मधून येणार होते. मात्र, जगभरातील अनेक ठिकाणी लॉकडाऊन असल्यामुळे त्यांना ते शक्य झालं नाही. त्यामुळे दोघांनी आधीच विवाह उरकण्याचा निर्णय घेतला. ‘सर्वांचे स्वास्थ व्यवस्थित असताना’ या दोघांनी छोट्या पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय घेतला. रुग्णालयाकडून या लग्नातील काही क्षण त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

या दोघांचे व्हायरल झालेले फोटो अनेकांच्या पसंतीस उतरत आहेत. सोशल मीडियावरती जॅन आणि नवरत्नम यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव पडत आहे. आरोग्य मंत्रालयाचे सचिव मॅट हँकॉक यांनी देखील ट्विट करत ‘this is lovely’ असं म्हणत या दोघांच कौतुक केलं आहे.

तसेच कोरोना संसर्गाशी सामना करणाऱ्या या फ्रंटलाईन योद्धांना रुग्णालयात लग्नाची परवानगी दिल्याने सोशल मीडियावरती रुग्णालय प्रशासनाचे देखील कौतुक केलं जात आहे.