‘घरभाडे’ न दिल्याचा राग, तुझ्यामुळे ‘कोरोना’ होईल म्हणत ‘नर्स’ला मारहण

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – डॉक्टर व परिचारिका आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांवर उपचार करत त्यांना बरे करण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहे. कोरोनाविरोधातल्या लढ्यातील डॉक्टर आणि परिचारिकांचा सर्वच स्तरातून सन्मान केला जात आहे. मात्र, नागपूरमध्ये उलटं पहायला मिळत आहे. रुग्णांना सेवा देणाऱ्या परिचारिकचा सन्मान करण्याऐवजी घरमालकाने नातेवाईकांच्या मदतीने घरभाड्यावरून वाद घातला आणि परिचारिकेला मारहाण केली. ही घटना नागपूरमधील कर्नलबाग परिसरात घडली.

राजश्री अमित सुरेश (वय-31) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी घरमालक संजय भागवत आणि त्याचे नातेवाईक अलका भागवत, गौरी व सोनू भागवत या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. राजश्री या एका हॉस्पिटलमध्ये परिचारिका आहेत. त्या भागवत यांच्या घरामध्ये भाड्याने राहतात. बुधवारी दुपारी त्या हॉस्पिटलमधून घरी आल्या. त्यांच्या मागोमाग भागवत कुटुंबीय घरात आले.

भागवत यांनी राजश्री यांच्याकडे घरभाड्याची मागणी केली. त्यांनी आर्थिक अडचण असल्याचे सांगून पुढील महिन्यात भाडे देते असे भागवतला सांगितले. तू हॉस्पिटलमध्ये काम करते, तुझ्यामुळे आम्हालाही कोरोना होईल असे म्हणत भागव कुटुंबीयांनी राजश्री यांना शिवीगाळ करत मारहाण केली. राजश्री यांनी गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी भागवत कुटुंबीयांवर शिवीगाळ व मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.