राज्यात विविध मागण्यांसाठी नर्सेस आक्रमक, 2 तास कामबंद आंदोलन

पोलीसनामा ऑनलाईन –  कोरोना कालावधीत इमानइतबारे काम करणार्‍या नर्सेसची रिक्त असलेली 6 हजार पदे तातडीने भरावी, कंत्राटीकरण करण्यात येऊ नये. रोटेशननुसार 7 दिवस कोविड ड्युटी व त्यानंतर 7 दिवस अलगीकरण रजा देण्यात यावी. कोविड ड्युटी 4 तासांच्या शिफ्टमध्ये असावी यासह अन्य काही महत्वाच्या मागण्यांसाठी राज्यभरात आज परिचारिकांनी आंदोलन केले.

परिचारिकांच्या प्रलंबित मागण्यांकरिता शासनाकडे वारंवार निवेदने देण्यात आली आहेत. मात्र अद्यापपावेतो कुठलीही दखल घेण्यात न आल्याने लक्ष वेधण्याकरिता महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन मार्फत आज राज्यव्यापी दोन तास कामबंद लक्षवेधी आंदोलन करण्यात येत आहे. पुणे, नाशिकमध्ये नर्सेसनी हे आंदोलन केले. नाशिकमध्ये शासकीय जिल्हा रुग्णालय आणि विभागीय संदर्भ रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर परिचारांकांकडून आज सकाळी शासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात येत निषेध नोंदवण्यात आला. परिचारिकांनी मोठ्या संख्येने यात सहभाग नोंदवला होता. कोविड ड्युटी नंतर परिचारिकांची स्वॅब टेस्ट करण्यात यावी. हृद्यरोग, मधुमेह, श्वसनसंस्थेचे आजार व इतर गंभीर आजार असलेल्या परिचारिकांना कोविड ड्युटीमध्ये सूट मिळावी. कोविड रुग्णास सेवा देतांना मृत्यू आल्यास शासनाने घोषित केलेली 50 लाख रुपये विम्याची रक्कम त्वरित मिळावी तसेच वारसास शासकीय सेवेत नोकरी द्यावी.परिचारिका बाधित झाल्यास त्यांच्यासाठी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी रुग्णालयात उपचारासाठी राखीव जागा असण्याच्या मागण्या करण्यात आल्या आहेत.