धक्कादायक ! परिचारिकांना सोसायटीतून निघून जाण्यासाठी ‘तगादा’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे नागरिकांच्या मनात धास्ती निर्माण झाली असून वेगवेगळ्या ठिकाणी काम करणार्‍यांना अनेकांकडून घरात येउ दिले जात नसल्याचे दिसूनआले आहे. जिल्हा रुग्णालयात रूग्णसेवा करणार्‍या काही परिचारिकांना राहत असलेल्या रहिवासी सोसायटीतून निघून जाण्याविषयी तगादा लावण्यात येत आहे. या प्रकरणी परिचारिकांनी मंगळवारी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

शहराच्या दीक्षितवाडी परिसरातील वानखेडे सोसायटीमध्ये हा प्रकार घडला आहे. या सोसायटीमध्ये सुमारे 20 कुटुंब हे वैद्यकीय सेवेशी संबंधित आहेत. यातील काही कुटुंबात परिचारिका असून त्या सध्या जिल्हा रुग्णालयात रुग्णसेवा करीत आहेत. देशात सध्या कोरोनामुळे आपत्कालीन परिस्थिती असून डॉक्टर, परिचारिका, पोलीस तसेच शासकीय कर्मचारी धैर्याने आपले कर्तव्य बजावत आहेत. दुसरीकडे वानखेडे सोसायटीने परिचारिकांना परिसर सोडून निघून जाण्यासाठी तगादा लावला आहे.

अनेक दिवसांपासून सातत्याने सोसायटीच्या अध्यक्षांकडून परिचारिकांना निघून जाण्यास सांगितले जात आहे. या त्रासाला वैगातून परिचारिकांनी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली. तक्रारीनंतर जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक अकबर पटेल यांनी सोसायटीच्या अध्यक्षांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. अध्यक्षांना रुग्णसेवा करत असलेल्या परिचारिकांसोबत सौजन्याने वागण्याची तंबी देण्यात आली. नोटीस देऊन समज देण्यात आली आहे.