‘भारतीय मुस्लीमांचे पुर्वज हे हिंदू होते’, अभिनेत्री खा. नुसरत जहाँच्या दुर्गा पुजेच्या वादावर विश्व हिंदू परिषदने सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तृणमूल काँग्रेसची खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ दुर्गापूजेनिमित्त पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दुर्गापूजेनिमित्त कोलकात्यातील दुर्गाभवन येथे पती निखिल जैन यांच्यासोबत कपाळाला कुंकू लावून उपस्थित राहिलेल्या नुसरतवर मुस्लीम धर्मगुरू नाराज झाले आहेत. त्यांनी यास इस्लामविरोधी म्हंटले आहे. आता विश्व हिंदू परिषदेनेही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. जर एखादा मुस्लिम दुर्गा मंडळात जाऊन नृत्य करत असेल तर त्यात काहीही चूक नाही जे काही मुस्लिम भारतात आहेत त्यांचे पूर्वज हिंदू होते असं विहिंपने सांगितले आहे.

विश्व हिंदू परिषद (व्हीएचपी) चे कार्याध्यक्ष आलोक कुमार म्हणाले की , ‘जे गंगा-जमुना तहजीबबद्दल बोलतात आणि आपल्याला सहिष्णुतेचा धडा शिकवतात, ते ज्ञात आहेत. रामलीला केवळ भारतातच नव्हे तर जगातील बर्‍याच मुस्लिम देशांमध्ये चालते. आम्हाला विश्वास आहे की भारतातील सर्व मुस्लिमांचे पूर्वज हिंदू होते. जर एखादा मुस्लिम दुर्गा मंडळात जाऊन नृत्य करत असेल तर त्यात काहीही चूक नाही. दुसरीकडे, जर एखादा हिंदू रमजान महिन्यात इफ्तार देईल तर याचा अर्थ असा नाही की त्याने आपला धर्म बदलला आहे.’

इस्लाम सोडून दुसऱ्या धर्मात लग्न केल्यामुळे देखील नुसरत जहाँ वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. हिंदू धर्माप्रमाणे कपाळावर कुंकू लावणे, तसेच लोकसभेत पाश्चिमात्य पेहरावात जाणे यावरूनही तिच्यावर मोठी टीका झाली होती. दुर्गापूजेच्या प्रसंगी कोलकत्ताच्या एका मंडळात आपल्या पती बरोबरच म्हणजेच निखिल जैन यांच्या बरोबर उपस्थित होती, यावर देवबंद उलेमा पुन्हा एकदा नाराज झाले आहेत. यावर देवबंद उलेमाचे म्हणणे आहे की जर नुसरत जहाँ हिला धर्मा विरोधात काम करायचे आहे की, तर तिने आपले नाव बदलावे.

Visit : Policenama.com