‘नुतन’ च्या विद्यार्थ्यांनी गिरवले बँकिंगचे धडे

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दप्तर मुक्त शनिवार उपक्रम नियमितपणे राबवला जातो. इयत्ता ६ वीच्या गणित विषयात बँक व सिंपल इंटरेस्ट हा पाठ शिकवत असताना विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता थेट बँकेशी संबंधित सर्व व्यवहारांची माहिती देणारा अभिनव उपक्रम शिक्षिका नीता जेजुरकर व मंजू वाधवा यांनी घेतला.

या उपक्रमात बँकिंगशी संबंधित सर्वच विभाग कॅशियर, बचत खाते, चालू खाते, मुदत ठेव, विविध प्रकारची कर्जे, आर. डी. चौकशी व सुरक्षा विभाग ए.टी.एम., शाखाधिकारी आदींच्या केबिन्स तयार करून विद्यार्थ्यांनी बँकिंगचे व्यवहार प्रत्यक्ष कृतीतून अनुभवले.

याकामी विविध प्रकारची चलने, खेळण्यातील नोटा, पासबुक आदींचा वापर करण्यात आला. ग्राहक म्हणून विद्यार्थी व पालकांनी भूमिका बजावली अशी माहिती शाळेचे प्राचार्य सत्तार शेख यांनी दिली.

या उपक्रमात तेजस पोटे, करुणा पांडे, साधक कुलकर्णी, सान्वी निकाळे, चेतन शर्मा, अंशू शेजवळ, पूजा नाहाटा, ओम शुक्ला आदींनी विविध भूमिका बजावल्या. दिवसभरात विविध पालकांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक करून समाधान व्यक्त केले.

संस्थेचे मार्गदर्शक व जनरल सेक्रेटरी गोविंदराव होळकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप होळकर, सदस्य हसमुखभाई पटेल, योगेश पाटील, सचिन मालपानी व चंद्रशेखर होळकर यांनी सहभागी शिक्षक व विद्यार्थ्यांच्या प्रयोगशीलतेचे कौतुक केले.