ओ नगरसेवक म्हणत ‘त्यानं’ चक्क नगरसेविकेलाच ‘लुटलं’

पनवेल : पोलीसनामा ऑनलाइन – नगरसेविका आणि महिला बाल कल्याण समितीच्या सभापती असलेल्या कुसुम रवींद्र म्हात्रे यांना चोरट्यांनी हातोहात चूना लावून लूटले. नगरसेविका म्हात्रे या कामोठे परिसरात आपल्या घराकडे चालत जात असताना अज्ञात व्यक्तींनी त्यांना ओ नगरसेवक, अशी हाक मारली. कुणीतरी ओळखीचे आहे, असे वाटल्याने त्या थांबल्या असता बाईकवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या अंगावरील दागिने खेचून पळ काढला. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. शिवाय, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे.

ही घटना घडल्यानंतर म्हात्रे यांनी पोलिसांना ताबडतोब माहिती दिली. त्यांनतर कामोठे पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. रविवारी कुसुम म्हात्रे त्यांच्या महिला कार्यकर्त्यांसह पक्षाच्या कार्यक्रमासाठी मुंबई येथे गेल्या होत्या. कार्यक्रम आटोपल्यानंतर त्या खासगी गाडीने कामोठे वसाहती जवळ महामार्गावर उतरल्या. यावेळी त्यांच्यासोबत 5 ते 7 महिला कार्यकर्त्या सुद्धा होत्या.

कमोठे हायवेवरून म्हात्रे आणि त्यांच्या सोबतच्या महिला रात्री साडेआठच्या सुमारास चालत जात असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांना हाक मारून गळ्यातील सोन्याचे दागिने खेचून पळ काढला. याप्रसंगी म्हात्रे यांनी आरडाओरड केली. परंतु, तोपर्यंत चोरट्यांनी सोन्याचे गंठण आणि सोनसाखळी घेऊन पळ काढला होता. यानंतर नगरसेविका कुसुम म्हात्रे यांनी थेट कामोठे पोलीस ठाणे जाऊन तक्रार दाखल केली. कामोठे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.