‘त्यावेळी मुंडेंच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी केल्याने मला पक्ष सोडण्यास भाग पाडले, आता खडसेंच्या बाबतीत तेच घडले’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी भाजपाला (BJP) सोडचिठ्ठी देण्याचा निर्णयानंतर राज्याच्या राजकारणात अनेक गौप्यस्फोट होऊ लागले आहेत. एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर आता माजी आमदार आणि ओबीसी (OBC) नेते प्रकाश शेंडगे (prakash shendge) यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे (gopinath mundhe) यांना झालेल्या अपघाताची चौकशी करण्याची मागणी केल्याने मला पक्ष सोडण्यास भाग पाडण्यात आले होते. मला तिकिटही नाकारण्यात आले होते. आता खडसेंच्या बाबतीतही तेच घडलेय, असा आरोप शेंडगे यांनी केला आहे.

खडसेंच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना प्रकाश शेंडगे म्हणाले की, मी दिवंगत गोपीनाथ मुंडेंसोबत राजकीय जीवनात काम केले होते. त्यांच्यासोबत ओबोसी समाजातील अनेक नेते होते. एकनाथ खडसे हे देखील त्यांच्यापैकीच एक होते. 2014 मध्ये ज्यावेळी गोपीनाथ मुंडे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर मी या प्रकरणाच्या सीबीआय चोकशीची मागणी केली होती. मात्र त्या मागणीमुळे मला पक्ष सोडावा लागला होता. निवडणुकीत माझं तिकिटही कापण्यात आलं होतं, असा दावा शेंडगे यांनी केला आहे.

मागील अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे (eknath khadse) भाजपला (bjp) रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. अखेर एकनाथ खडसे यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले. खडसे शुक्रवारी (दि.23) राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत जयंत पाटील (jayant patil) यांनी प्रसारमाध्यांशी संवाद साधताना अधिकृतरीत्या घोषणा केली.