मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर OBC नेते नाराज, तोंडाला पाने पुसल्याचा आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काल राज्यातील ओबीसी नेत्यांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. ओबीसी आणि धनगर समाजाच्या विविध मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री आणि ओबीसी नेते यांच्या झालेल्या बैठकीत अपेक्षीत प्रतिसाद न मिळाल्याने ओबीसी नेते नाराज झाल्याचे वृत्त आहे.

या बैठकीला ओबीसी नेते चंद्रकांत बावकर, जे. डी. तांडेल इत्यादी उपस्थित होते. आपली नाराजी पत्रकारांकडे व्यक्त करताना या नेत्यांनी म्हटले की, या बैठकीतून यातून कोणतीही सकारात्मक बाब समोर आली नाही. मागण्यांकडे दुर्लक्ष करून केवळ मंत्री उपसमिती नेमून आमच्या मागण्यांना पानं पुसली आहेत. आम्हाला ओबीसी समाजासाठी निधी हवा होता त्याबाबत काहीही बोलले गेले नाही.

या बैठकीत एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला, तो म्हणजे मराठा समाजासाठी नेमलेल्या मंत्री गटाप्रमाणे ओबीसी समाजासाठी मंत्री गट स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र, मुख्यमंत्र्यासोबतच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेऊनही अन्य मुद्दे दुर्लक्षित राहिल्याने ओबीसी नेत्यांनी नाराजी व्यक्त केली.