OBC आरक्षणाला धक्का लावल्यास संघर्ष अटळ, ओबीसी नेत्यांचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   आमचा मराठा आरक्षणला विरोध नसून मराठा समाजाला आरक्षण दिलेच पाहिजे. पण, ओबीसींमध्ये मराठा समाजाला आरक्षण देऊ नये. ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्यास संघर्ष अटळ आहे, असा इशारा ओबीसी नेत्यांनी आज दिलाय. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी हा इशारा दिलाय.मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे. त्यांना आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही, पण मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देऊन ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये, नाही तर संघर्ष अटळ राहील. संघर्ष होऊ नये, जातीय सलोखा कायम राहावा, ही आमची भूमिका आहे. सरकारनेही हा सलोखा कायम ठेवण्याचा प्रयत्न करावा, असे प्रकाश शेंडगे यांनी केलीय.

मराठा समाजाला एससीबीसीत घालण्याचं षडयंत्रं झालंय. आमचा त्याला विरोध असून सर्वोच्च न्यायालयामध्ये हे आरक्षण टिकणार नाही. ही कल्पना पूर्वी होती. आता तेच घडलं आहे, असेही ते म्हणाले. काही मराठा नेते ओबीसी आरक्षणाबाबत प्रक्षोभक वक्तव्य करत आहे. त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले.

धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. धनगर समाजाला आरक्षण न दिल्यास सरकारला सळो की पळो करून सोडू, असा इशारा त्यांनी दिलाय. धनगर समाजासाठी 6 आणि ओबीसींसाठी 74 वस्तीगृहे स्थापन करण्याची घोषणा राज्याचे मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलीय. या घोषणेची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केलीय.