वाकळे, जाधव , शिंदे यांच्या नगरसेवक पदावर हरकत

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपचे नगरसेवक बाबासाहेब वाकळे, शिवसेनेचे अनिल शिंदे, सुवर्णा जाधव यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी महापालिका निवडणुकीतील पराभूत उमेदवारांनी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात आज  याचिका दाखल केल्या आहेत. त्यावर 31 डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

बाबासाहेब वाकळे यांना तिसरे अपत्य आहे. तिसरे अपत्य असल्याने वाकळे यांचे पद रद्द करण्यात यावी, अशी मागणी अर्जुन बोरुडे यांनी याचिकेत केली आहे. वाकळे हे भारतीय जनता पक्षाकडून महापौर पदासाठी इच्छुक होते.

दत्ता गाडळकर यांनी शिवसेनेचे नगरसेवक अनिल शिंदे यांच्या निवडीवर हरकत घेतली आहे. शिंदे हे प्रभाग क्रमांक 15 मधून विजयी झाले आहेत. त्यांनी प्रभाग 13 मधील 700 मतदारांची नावे ‘बीएलओ’ला हाताशी धरून प्रभाग क्रमांक 15 मध्ये घेतली. या प्रभागातून शिंदे यांचा सुमारे 400 मतांनी विजयी झाले आहेत.

ही मते चुकीच्या पद्धतीने समाविष्ट करण्यात आली. त्यामुळे शिंदे यांची निवड रद्द करून माझी नगरसेवकपदी निवड जाहीर करावी, अशी मागणी गाडळकर यांनी न्यायालयात केली आहे. भाजपाच्या पराभूत उमेदवार गितांजली काळे यांनी शिवसेनेच्या नगरसेविका सुवर्णा जाधव यांच्या निवडीवर हरकत घेतली आहे. जाधव यादेखील प्रभाग क्रमांक 13 मधील मतांतून निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचे पद रद्द करून माझी निवड करावी, अशी मागणी काळे यांनी न्यायालयात केली आहे.