लोकसभेसाठी ३३ टक्के महिला उमेदवार

भुवनेश्वर : वृत्तसंस्था – ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बीजू जनता दलचे अध्यक्ष नवीन पटनायक यांनी लोकसभा निवडणुकांआधी मोठी घोषणा केली आहे. एका सभेला संबोधताना त्यांनी सांगितले की त्यांचा पक्ष तिकीटवाटपात महिलांना ३३ टक्के आरक्षण देणार आहे. नवीन पटनायक यांनी यापूर्वी संसदेत महिला आरक्षणाचा मुद्दा लावून धरला होता.

केंद्रपाडा येथे एका जाहीर सभेत बोलत असाताना पटनायक यांनी ही घोषणा केली. ओडिशातील जनतेने हे दाखवून दिले पाहिजे की येथील महिला सशक्त आहेत. तसेच राष्ट्रनिर्माणात आपले योगदान देत आहेत. ओडिशात लोकसभेसह विधानसभेच्याही निवडणुका होणार आहेत.

ओडिशाचे माजी मुख्यमंत्री हेमानंद बिसवाल यांची मुलगी आणि काँग्रेसची नेता सुनीता बिसवाल यांनी शनिवारी बीजू जनता दलात प्रवेश केला. सुनिता बिसवाल यांनी बीजू जनता दलात प्रवेश करण्यापूर्वी काँग्रेसने एक परिवार, एक टिकीट अशी घोषणा केली होती. सुंदरगढ जिल्हा काँग्रेसच्या माजी कार्यकारी अध्यक्ष सुनीता बिसवाल यांनी नवीन पटनाईक यांच्या उपस्थित आपल्या कार्यकर्त्यांसह बीजू जनता दलमध्ये प्रवेश केला होता.