Coronavirus : कोरोनामुळे ‘या’ राज्याने 30 एप्रिलपर्यंत वाढवला ‘लॉकडाऊन’

ओडिशा : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसने संपूर्ण देशात थैमान घातले असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहिर केला. 14 एप्रिल रोजी लॉकडाऊनची मुदत संपत असून अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनचा कालावधी वाढवावा अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे ओडिशामध्ये लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. 14 एप्रिलला संपणारा लॉकडाऊन 30 एप्रिल पर्यंत वाढवण्यात आला आहे. ओडिशा सरकारने राज्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे.

देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन संपवण्यापूर्वीच ओडिशा सरकारने लॉकडाऊन 30 एप्रिल पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला असू असं करणारं हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी ही घोषणा केली आहे. ते म्हणाले, राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था 17 जूनपर्यंत बंद राहतील. त्याचबरोबर त्यांनी केंद्र सरकारला 30 एप्रिलपर्यंत रेल्वे व हवाई सेवा सुरू न करण्याचे आवाहन केले आहे.

देशात कोरोना बाधित रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या 5 हजाराच्यावर गेली आहे. यामध्ये आतापर्यंत 411 रुग्ण बरे होऊन आपआपल्या घरी परतले आहेत. तर 149 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन असून 14 एप्रिलला याची मुदत संपत आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता देशातील लॉकडाऊन वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.