अधिकार्‍यांकडून होणार्‍या टोलवाटोलवीला कंटाळून शेतकर्‍यानं केलं देशी जुगाड, केलेल्या चमत्काराचा पाहा व्हिडीओ

पोलिसनामा ऑनलाईन – एकदा ठरवलं की या जगात अशक्य असं काहीच नाही. अशीच एक सुखद धक्का देणारी घटना ओडिसातील मयूरभंज जिल्ह्यात घडली आहे. येथे असणाऱ्या एका शेतकऱ्याने पुन्हा एकदा हे सिद्ध करून दाखवले आहे. या शेतकऱ्याच्या शेतात पाणी येत नव्हते, अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही, विनवणी करूनही शेतकऱ्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात होते. अखेर या शेतकऱ्याने केलेल्या कारनाम्यामुळे आसपासच्या गावातील लोकही आश्चर्यचकीत झाले.

 

 

 

 

 

येथे महूर टिपरिया नावाच्या एका शेतकऱ्याने नदीपासून २ किमी लांब असलेल्या शेतात पाणी घेऊन जाण्यासाठी एक देशी जुगाड बनवला आहे. त्याने नदीत एका चक्राच्या माध्यमातून लाकडाच्या आधारे जुगाड बनवला आणि पाणी शेतापर्यंत घेऊन गेला आहे. एका मोठ्या लोखंडी वर्तुळात प्लॅस्टिकच्या रिकाम्या बॉटलचा मागच्या बाजूचा काही भाग कापून जोडण्यात आला, हे चक्र पवनचक्की सारखं असून पाणी आणि हवेच्या माध्यमातून सतत फिरते राहते. या चक्रात शेतकऱ्याने रिकाम्या पाण्याच्या बॉटल्स जोडल्या आहेत. या बॉटल्सचा मागचा हिस्सा कापून त्याला एका मगाप्रमाणे वापरण्यात आले आहे. ज्यात नदीचं पाणी भरलं जातं आणि ते पुन्हा एका लाकडाच्या पाइपमध्ये सोडलं जातं. या चक्राला जवळपास ३०-४० बॉटल्स लागल्या असून चक्र जसं फिरतं तसं बॉटलमध्ये पाणी भरलं जातं आणि पाइपच्या सहाय्याने शेतापर्यंत पोहचवलं जातं.

याबाबत शेतकऱ्याने सांगितले की, “मी एक गरीब माणूस असून वारंवार अधिकाऱ्यांकडे माझ्या शेतात सिंचनासाठी पाण्याची व्यवस्था करावी यासाठी अर्ज दिला होता, पाठपुरावा करूनही माझ्या पदरी निराशा लागली, अखेर या दिरंगाईला कंटाळून मी हा मार्ग शोधून काढला.” शेतकऱ्याच्या या कल्पकतेमुळे अनेक लोकांनी त्याचा अविष्कार बघण्यासाठी गर्दी केली होती, अधिकाऱ्यांच्या कोणत्याही मदतीविना शेतकऱ्याने नदीपासून २ किमी दूर असलेल्या शेतात पाणी पोहचवलं, या वृत्ताला ANI ने ट्विट केलं आहे, ज्यात शेतकऱ्याने बनवलेले चक्र व्हिडीओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. तुम्ही हा व्हिडीओ पाहू शकता.