Coronavirus : ओडिशात बनणार 1000 बेडचे 2 मोठे ‘कोरोना’ हॉस्पीटल, असं करणारं पहिलं राज्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असून देशातील प्रत्येक राज्यामध्ये कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले आहेत. देशामध्ये आतापर्यंत 649 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारांकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. ओडिशामधील नवीन पटनायक सरकारने राज्यामध्ये कोरोना संक्रमण झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी देशातील सर्वात मोठे दोन रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या रुग्णालयामध्ये 1000 बेड असणार असून अशा प्रकारेच रुग्णालय उभारणारे ओडिशा देशातील पहिले राज्य ठरणार आहे.

मुख्यमंत्री पटनायक यांचे निर्देश
मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या हॉस्पिटलसाठी ओडिशा मायनिंग कॉर्पोरेशन आणि महानंदी कोल्डफील्ड्स लिमिटेड यांची मदत घेण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांना योग्य आरोग्य सेवा देण्याचे निर्देश दिले आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारकडून 19 नव्या रुग्णालयांची उभारणी करण्यात येणार आहे.


‘या’ ठिकाणी बनणार रुग्णालय
मुख्यमंत्री कार्यालयाच्या माहितीनुसार, ओडिशामध्ये उभारण्यात येणारे 1000 बेडचे दोन रुग्णालय भुवनेश्वर याठिकाणी उभारण्यात येणार आहेत. यासंबंधी गुरुवारी लोकसेवा भवन येथे झालेल्या इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायंन्स अ‍ॅण्ड हॉस्पीटल आणि कलिंगा इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्स यांच्यामध्ये करार झाला आहे.

ओडिशा पहिलेच राज्य
करारानुसार कोरोना रुग्णालय पुढील काही दिवसांत सुरु करण्याची तयारी करण्यात आली आहे. हे दोन रुग्णालय सुरु झाल्यावर अशा प्रकारचे रुग्णालयाची उभारणी करणारे ओडिशा हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. इतर ठिकाणी देखील अशा प्रकारचे उपक्रम राबवण्यात यावेत असे निर्देश मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी दिले आहेत.

लॉकडाऊनचे पालन करण्याचे आवाहन
देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी कोरोनाला रोखण्यासाठी सर्वांनी लॉकडाऊनचे पालन करावे असे आवाहन राज्यातील जनतेला केले आहे. नवीन पटनायक यांनी ट्विट करून म्हटले आहे की, जगभरात हा व्हायरस पसरत आहे. अशा संकटाच्या वेळी सर्वांनी एकत्र येवून या संकटाला सामोरे गेले पाहिजेत. यासाठी पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाचे सर्वांनी पालन करावे.

You might also like