Coronavirus : नववधू ‘कोरोना’ संशयित म्हणून केले अत्याचार, पती आला ‘गोत्यात’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : ओडिशामधून एक विचित्र घटना समोर आली आहे. जिथे एका नवविवाहित महिलेने तिच्या सासरच्या लोकांवर आरोप केला आहे की, कोरोना विषाणूच्या संशयामुळे तिचा नवरा आणि सासरच्यांनी तिच्यावर अत्याचार केले आहे. एवढेच नाही तर तिच्याकडून हुंड्याची मागणीदेखील करण्यात आली आणि हुंडा न दिल्याने तिला एकटे ठेवण्यात आले.

हे प्रकरण ओडिशाच्या नबरनपूर जिल्ह्यातील आहे. या महिलेचे 2 मार्च रोजी जयंत कुमार नावाच्या युवकाशी लग्न झाले होते. पण नंतर तो तिला कोरोनाचा रुग्ण म्हणवून त्रास देऊ लागला. लग्नाच्या वेळी महिलेच्या कुटुंबीयांनी हुंड्यासाठी रोख, दागिने, दुचाकी आणि मौल्यवान वस्तू अडीच लाख रुपये दिले होते. दरम्यान, पीडितेने सांगितले कि, इतके पैसे देऊनही सासरच्यांनी पाच लाख रुपयांची मागणी केली. महिलेने सांगितले की, लग्नाच्या तयारीत ती कामात व्यस्त होती, ज्यामुळे सर्दी, खोकला आणि ताप यासारखे लक्षण निर्माण झाले होते.

नवऱ्या व सासरच्यांनी केलेल्या छळाला कंटाळून नवविवाहित मुलीने सासर सोडून उमरकोट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या महिलेने पोलिसांना सांगितले की, ‘आधी माझ्या नवऱ्याने आणि सासरच्यांनी हुंडा मागून माझा छळ केला. ‘ त्याच वेळी तिने पोलिसांना सांगितले की, ‘जेव्हा मला सर्दी आणि खोकल्याची लक्षणे दिसू लागली. तेव्हा मी कोरोना विषाणूचा रुग्ण असल्याची शंका घेऊ लागले. यानंतर, त्यांनी मला बेडऐवजी जमिनीवर झोपायला भाग पाडलं आणि मला शौचालय वापरायलाही परवानगी दिली नाही.

पोलिस एसपी नितीन कुसाळकर यांनी म्हंटले कि, ‘हुंड्याच्या छळाबद्दल उमरकोट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. तक्रारीत महिलेवर कोरोना विषाणूचा संशयही जोडला गेला. आम्ही जयंत कुमार आणि त्याच्या वडिलांना अटक केली आहे आणि घरगुती हिंसाचाराच्या गुन्ह्याबद्दल यू / एस 498 (ए), 323, 506 आणि 34 आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.