रुग्णवाहिकेचे इंधन संपल्याने रुग्णालयात वेळेवर पोहचू शकली नाही, गर्भवती महिलेचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ओडिसाच्या बारीपाडामध्ये रुग्णवाहिकामधून एका गर्भवती महिलेला सरकारी रुग्णालयात नेण्यात येत होते, परंतू रस्त्यातच काही अंतरावर रुग्णावाहिकेचे इंधन संपल्याने रुग्णावाहिका रुग्णालयापर्यंत जाऊ शकले नाही, या कारणाने गर्भवती महिलेला आपला जीव गमावावा लागला. या घटनेने प्रशासनावर आणि रुग्णालयाच्या व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.

शुक्रवारी रात्री हांडा गावातील चित्तरंजन मुंडा यांच्या पत्नीला म्हणजेच तुलसी मुंडा यांना प्रसुती वेदना सुरु झाल्या होत्या. त्यानंतर तब्येत नाजूक असल्याने त्यांना डॉक्टरांनी पंडित रघुनाथ मुर्मू मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात हलवण्यास सांगितले.

यानंतर गर्भवती महिलेला रुग्णावाहिकेने बारीपाडा भागातील पीआरएमएमसीएचसाठी रवाना करण्यात आले. जेव्हा रुग्णावाहिका रुग्णालयात जाण्यासाठी निघाली तेव्हा रस्त्यातच इंधन संपल्याने जवळपास 45 मिनिट रस्त्यातच थांबून राहिली.

45 मिनिटांनी दुसरी रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचली, परंतू प्रसुती वेदना अधिक झाल्याने महिलेचा मृत्यू झाला. मृत महिलेच्या पतीने सांगितले की रुग्णावाहिकेचे इंधन मध्येच संपल्याने दुसरी रुग्णावाहिका बोलावण्यात आली. त्यात जवळपास 1 तास गेला. रुग्णालयात पोहचल्यावर डॉक्टरांनी पत्नीला मृत घोषित केले.
या प्रकरणी मयूरभंज मुख्य जिल्हा आरोग्य अधिकारी प्रदिप महापात्रा यांनी सांगितले की या दुर्घटनेची माहिती मला आज मिळाली. रुग्णवाहिकेच्या इंधनाचा पाईप अचानक लिक झाल्याचे रुग्णावाहिका चालकाने सांगितले. या प्रकरणी तपासणीनंतर दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

Visit : Policenama.com