‘त्या’ बलात्कार प्रकरणातील आरोपीला लोणावळयातून अटक, 22 वर्षांपासून होता फरार 

पोलीसनामा ऑनलाईन टीम – १९९९ साली देशभरात खळबळ माजविणाऱ्या अंजना मिश्रा बलात्कार प्रकरणी पोलिसांच्या हाती मोठे यश आले असून  प्रकरणातल्या मुख्य आरोपीला लोणावळ्यातून अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलीस , पुणे ग्रामीण पोलीस आणि ओरिसा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बिबेकनंद बिस्वाल उर्फ  बिबन बिस्वाल या आरोपीला काल (२२ फेब्रुवारी) पुण्यातून अटक केली. भुवनेश्वरचे पोलिस आयुक्त सुधांशू सरंगी यांनी सुरु केलेले ‘ऑपरेशन सायलेंट व्हायपर’ राबवून सुमारे २२ वर्षांनी या नराधमाला अटक करण्यात आले.  दरम्यान, या प्रकरणातील २ आरोपीना याआधीच २६ जानेवारी, १९९९ रोजी अटक करण्यात आली होती.

माहितीनुसार, अंजना मिश्रा या भारतीय वनसेवेतील अधिकारी सुभाष चंद्र मिश्रा यांच्या पत्नी  आहे. त्या आपल्या पतीपासून विभक्त झाल्या होत्या. ९ जानेवारी, १९९९ रोजी पीडिता आपल्या पत्रकार एका मैत्रिणीसोबत गाडीतून जात होत्या. यादरम्यान भुवनेश्वर शहराच्या बाहेर एका निर्जन स्थळी तीन जणांनी त्यांची गाडी अडवली आणि मैत्रिणीसमोरच मिश्रा याच्यावर या नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी  प्रदीप साहू आणि धिरेंद्र मोहंती या आरोपीना अटक करत २० एप्रील २००२ रोजी ओरिसा न्यायालयाने त्यांना  जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर मुख्य आरोपी बिबन बिस्वाल हा अनेक वर्षांपासून फरार होता. १९९९ मध्ये ओरिसा उच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले होते. ५ मे १९९९ रोजी सीबीआयने या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले.

या बलात्कार प्रकरणाने देशभरात एकच खळबळ माजली होती.  या प्रकरणात ओरिसाचे तत्कालिन मुख्यमंत्री जे. बी. पटनाईक व त्यांचे मित्र आणि ओरिसाचे माजी अ‍ॅडव्होकेट जनरल इंद्रजित राय यांची प्रमुख भूमीका असल्याचा आरोप अंजना मिश्रा यांनी केला होता. त्यामुळे अर्थातच काँग्रेसला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. ज्यामुळे पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पटनाईक यांची मुख्यमंत्री पदावरून हकालपट्टी करत  गिरिधर गमांग यांची  नियुक्ती केली. एवढेच नव्हे तर यापूर्वीही तत्कालिन अ‍ॅडव्होकेट जनरल इंद्रजीत राय यांनी ११ जुलै १९९७ रोजी कामाच्या बहाण्याने बोलावून बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप  अंजना मिश्रा यांनी केला होता. मात्र, राय यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आली नव्हती. तत्कालीन मुख्यमंत्री हे राय यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप देखील मिश्रा यांनी केला.

त्यांनतर अनेक महिला संघटनांनी आंदोलने केली तसेच  मुख्यमंत्र्यांची भेट घेत प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी लावून धरली. प्रकरणाची तीव्रता पाहता ते सीबीआयकडे सोपविण्यात आले. त्यानंतर राय यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने बलात्काराच्या प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली राय यांना तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा देखील  ठोठावली होती. दरम्यान, या  कारवाईत महाराष्ट्र पोलिसांनी महत्वाची भूमिका बजावली. ज्यात नवी मुंबईचे पोलिस आयुक्त बिपिन कुमार सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँचचे उपायुक्त प्रवीण पाटील, एपीआय संतोष पवार,वरिष्ठ पोलिस निरिक्षक निवृत्ती कोल्हटकर, पुणे जिल्हा ग्रामीणचे अधिक्षक डाॅ. अभिनव देशमुख, पोलिस नाईक मिथून भोसले, सहाय्यक पोलिस अधिक्षक नवनीत कुमार, लोणावळा पोलिस ठाण्याचे निरिक्षक दिलीप पवार आणि पोलिस हेड काँन्स्टेबल निलेश केवाडे आणि भारत मोरे यांचा सहभाग आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी बिबन बिस्वाल हा नाव बदलून लोणावळ्यातील  अँबी व्हॅली येथे रहात होता. जालंधरा स्वैन या नावाने त्याने आपले आधारकार्डही बनवून घेतले होते. तेथे तो प्लंबरचे काम करत होता. या दरम्यान तो आपल्या कुटुंबाच्या  संपर्कात होता. एवढेच नव्हे  त्याने कुटुंबाला आपले डेथ सर्टिफिकेट बनविण्यास  सांगितले होते. ओरिसा पोलिसांना त्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने  महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधला, ज्यानंतर  ऑपरेशन सायलेंट व्हायपर राबवून पोलिसांनी या आरोपीला अटक केली.