पुण्यातील ‘त्या’ मेडीकलवर गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सैनिक व सरकारी रुग्णांसाठी असलेल्या औषधांची विक्री खुल्या बाजारात केल्याप्रकरणी सदाशिव पेठेतील शशांक फार्मा व सर्जिकल्सवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी विवेक पांडुरंग खेडकर (३८, बिबवेवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शशांक फार्माविरोधात औषधे, सौंदर्य प्रसाधने अधिनियमाच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सदाशिव पेठेतील शशांक फार्मा व सर्जिकल्सचे दुकान आहे. येथे १ एप्रील २०१८ ते २ फेब्रुवारी २०१९ दरम्यान शशांक फार्माचे णाल श्रीनिवास राजेश बाला व राजेश मोतीलाल भुतडा यांनी संरक्षण दलातील सैनिक व सरकारी रुग्णालयात गरीब व गरजू रुग्णांसाठी असलेल्या औषधांची खरेदी व विक्री केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्या खरेदी व विक्री बिलांच्या तपशीलावरून त्यांनी या औषधांची विक्री करून शासनाची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानंतर यासंदर्भात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बी. एम. रायकर करत आहेत.

एफडीएकडून यापुर्वी विक्री करणाऱ्या मेडीकल्सवर कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्याकडून दोन लाख ४० हजार रुपयांची औषधांचा साठा जप्त करण्यात आला होता.