मुदतबाह्य किटकनाशकांप्रकरणी त्या कृषि केंद्र चालकावर गुन्हा दाखल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – मुदतबाह्य किटकनाशकांची साठवणूक केल्याप्रकरणी पृथ्वी अग्रो सर्विसेस या कृषि केंद्रावर  कृषि विभागाने कारवाई केल्यानंतर आता पृथ्वी अग्रो चालकावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अहमदनगरचे कीटकनाशके निरीक्षक तथा जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक दीपक वसंत पानपाटील (वय-५४, रा. वैजनाथ सहकारी सोसायटी सावेडी अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून  छबुराव किसनराव हराळ (वय-५४ रा.शिवाजी हाऊसिंग सोसायटी बुरुडगाव तालुका जिल्हा अहमदनगर ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरोधात भा.दं.वि ४२०,४६८,४७१ सह कीटकनाशके अधिनियम १९६८ मधील कलम १० (३) १३ (१) १८ (२) सह कीटक नाशके नियम  १९७१ मधील नियम १० (अ) १२ (अ) १५,१९ व २० तसेच कीटक नाशके आदेश १९८६ मधील खंड  ३ व ६ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

पृथ्वी अग्रो सर्विसेसच्या गोदामावर कृषि विभागाच्या पथकाने छापा टाकला होता. त्यावेळी पथकाने १९ लाख ५० हजार रुपयांची मुदतबाह्य किटकनाशके जप्त केली.  मुदतबाह्य किटकनाशकांच्या पाकिटांना नवीन लेबल लावून ते शेतकऱ्यांना विकून फसवणूक केली जात असल्याचे समोर आले होते. या कारवाईनंतर कृषि विभागाने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान या कारवाईने व्यापारी धास्तावले आहेत. त्यामुळे धास्तावलेल्या व्यापाऱ्यांनी मुदबाह्य औषधे कारवाईच्या भीतीने नष्ट करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. शेवगाव नेवासा मार्गावर ढोरा नदीच्या पात्रात मुदत संपलेली बियाणांची पाकिटे मिळाली आहेत.