Coronavirus Lockdown : SRPF च्या 17 जवानांवर FIR दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोना महामारीला राष्ट्रीय आपत्ती जाहीर केले आहे आणि सगळ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना आपल्या कामावर हजार राहण्याचे आदेश दिले आहेत. असा आदेश असतानाही काही जवान गैरहजर राहिले. त्यामुळे राज्य राखीव पोलिस दलातील १७ जवानांवर निलंबनाची कारवाई करत आपत्ती व्यवस्थापन कायदा, महाराष्ट्र पोलिस अधिनियम व राज्य राखीव पोलिस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे जवान राज्य राखीव दलाच्या गट क्रमांक ८ मधील आहेत. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सहायक समादेशक लक्ष्मण आतकरी यांच्या तक्रारीवरून वनराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

कोरोना संक्रमितांची संख्या देशात महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. तसेच मुंबईतही या व्हायरसचे रुग्ण अधिक आहेत. कोरोना महामारीला राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर केले असून राज्यतील पोलिस दल, सुरक्षा यंत्रणांमधील ५५ वर्षांखालील सर्व अधिकाऱ्यांना-कर्मचाऱ्यांना ड्युटीवर हजर राहण्याचे आदेश दिले गेले आहेत. तरीही गोरेगाव मधील १७ जवान रजेवर होते. त्यांची रजा रद्द झाल्यानंतरही ते ड्युटीवर हजर राहिले नाहीत. त्यांना व्हॉट्सॲप मेसेजद्वारे आणि फोनवरून कामावर हजर राहण्याचे आदेश दिले गेले असताना त्यापैकी एकानेही आदेशाचे पालन केले नाही.

यानंतर त्यांना दुसऱ्यांदा आदेश दिला गेला की, हजर न राहिल्यास कारवाई करण्यात येईल. तेव्हाही हे जवान आपल्या ड्युटीवर हजर राहिले नाहीत. शेवटी या १७ जवानांना निलंबन केल्याचे पत्र देण्यात आले. विभागाअंतर्गत चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिल्यानंतरही ते हजर राहिले नाहीत. त्यामुळे एसआरपीएफचे सहायक समादेशक लक्ष्मण आतकरी यांनी वनराई पोलिस ठाण्यात या १७ जवानाविरोधांत गुन्हा दाखल केला.