१५ हजाराची लाच मागण्याऱ्या कर निरीक्षक कार्यालयातील तिघांविरोधात गुन्हा

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – चारा छावणी चालकाला सकारात्मक अहवाल पाठविण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी राज्य कर निरीक्षक कार्यालयातील तीन जणांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारूती गंगाधर मुपडे (वय ३५ वर्षे, राज्य कर निरीक्षक, वस्तू व सेवा कार्यालय, बीड), गोविंद रमेशराव लोळगे (वय ३३, राज्य कर निरीक्षक, वस्तू व सेवा कार्यालय, बीड) व भारत साजन मेहेर (राज्य कर निरीक्षक, वस्तू व सेवा कार्यालय, बीड) अशी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार यांची बीड तालुक्यातील मौजे शिवणी येथे चारा छावणी आहे. ते चालवत असलेल्या चारा छावणीच्या तपासणीसाठी तिघे आल्यानंतर चारा छावणीत मोठ्या प्रमाणात त्रुटी आहेत. त्यामुळे त्याचा सकारात्मक अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यासाठी मुपडे, लोळगे, मेहेर यांनी २५ हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदार यांनी अँटी करप्शनकडे तक्रार केली. दरम्यान अँटी करप्शनने याची पडताळणी केल्यावर त्यांनी जरुड फाटा येथे २५ हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर तडजोडीअंती ते तिघे १५ हजार रुपयांवर तयार झाले. मात्र त्यांना तक्रारदार यांचा संशय आल्याने लाच स्विकारली नाही.

त्यानंतर अँटी करप्शनच्या पथकाने याची चौकशी केल्यावर त्यांनी १५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार तिघांवर पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.