तळेगावच्या नगराध्यक्षाच्या पती, नगरसेवकाविरोधात गुन्हा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या महिला नगराध्यक्षाच्या पती आणि नगरसेवक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनी जेसीबी पाठवून तळेगाव दाभाडे येथील मोहर प्रतिमा गृहप्रकल्पाची पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन तोडून ८ लाख रुपयांचे नुकसान केल्याची तक्रार दोघांविरोधात करण्यात आली आहे.

नगराध्यक्षा चित्रा जनागडे यांचे पती संदिप जनागडे व नगरसेवक अमोल शेटे तसेच दोन जेसीबीचालक व इतर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकऱणी संतोष तिलोटकर (३७, पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी जेसीबी सुपरवायजरला तात्काळ अटक केली आहे.

तिलोटकर यांच्या कंपनीने तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने घालून दिलेल्या सर्व नियम व अटींच्या अधीन राहून मोहर प्रतिमा गृहप्रकल्पासाठी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकली होती. तिची लांबी ३६० मीटर आहे. दरम्यान संदिप जनागडे आणि नगरसेवक अमोल शेटे यांनी दोन जेसीबी व दोन व्यक्तींना पाठवून ती पाईपलाईन उचकटून ८ लाख रुपयांची नुकसान केले. असे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी जेसीबी सुपरवायजरला अटक केली आहे.