पोलीसाकडून लाच घेणाऱ्या ‘त्या’ अधिक्षकाला ४ वर्षे कारावास

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पोलीस शिपायाला गृहकर्ज मंजूर करून देण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी राज्याच्या पोलीस मुख्यालयातील कार्यालय अधिक्षकाला चार वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. बळीराम शिंदे असे या कार्यालय अधिक्षकाचे नाव आहे.

अतिरिक्त सरकारी वकील जे. व्ही. देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष भोईटे या पोलीस शिपायाने घरासाठी कर्ज मिळावे म्हणून अर्ज केला होता. ते प्रकरण पोलीस महासंचालक कार्यालयात वर्षभर पडून होते. त्यावेळी तेथील अधीक्षक असलेल्या शिंदे याने कर्ज मंजूर करून घेण्यासाठी भोईटे यांच्याकडे २२ हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर तडजोडीअंती शिंदे १० हजारांवर तयार झाला. याची माहिती पोलिस शिपाई भोईटे यांनी ‘एसीबी’ला दिली. त्यानुसार सापळा रचला गेला व २१ ऑक्टोबर २०१४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर भोईटे यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना शिंदेला रंगेहाथ पकडण्यात आले. खटल्यात पोलीस खात्यामधीलच नऊ साक्षीदारांनी दिलेल्या साक्षीमुळे शिंदे याच्यावरील आरोप सिद्ध झाले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) दाखल गुन्ह्यात सर्व आरोपांत दोषी ठरवून विशेष न्यायालायचे न्यायाधीश आशुतोष भागवत यांनी बळीराम शिंदे याला चार वर्षांच्या कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.