…अन् झाडू मारता मारता ‘ती’ बनली ग्रामपंचायत अध्यक्षा, 10 वर्षाच्या कष्टाच झालं चीज

तिरुवनंथपुरम : पोलीसनामा ऑनलाईन –   कष्टाच फळ उशीरा का होईना मिळते असे म्हटले जाते, पण ते एका महिलेच्या बाबतीत अगदी खरे ठरले आहे. ज्या ग्रामपंचायत कार्यालयात महिलेने सफाई कर्मचारी म्हणून गेली 10 वर्ष झाडू मारण्याचे काम केले, आता त्याच ग्रामपंचायतीची अध्यक्षा होण्याची संधी त्या महिलेला मिळाली आहे. केरळमधील कोल्लम जिल्ह्यात हा अभिमानास्पद घटना समोर आली आहे.

ए. आनंदवल्ली असे ग्रामपंचायतीची अध्यक्षा बनलेल्या नशिबवान महिलेचे नाव आहे. पठाणपूरम पंचायत कार्यालयात ए. आनंदवल्ली या गेल्या 10 वर्षांपासून सफाई कमर्चारी म्हणून सेवा बजावत होत्या. कार्यालयात कचरा काढणे, स्वच्छता राखणे, कार्यालयात काम करणाऱ्यांच्या चहा-पानाची व्यवस्था करणे अशी कामे त्या करत असत. नुकत्याच झालेल्या पंचायत निवडणुकांमध्ये त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. केरळमध्ये डाव्या संघटनांनी जोरदार मुसंडी मारत अनेक जागांवर विजय मिळवला आहे. ए. आनंदवल्ली यांनी पठाणपूरम ग्रामपंचायत अध्यक्ष निवडणुकीत अनुसूचित जाती-जमातीसाठी आरक्षित असलेल्या जागेवर सुमारे 654 मतांनी विजय मिळवला.

केरळमधील ग्रामपंचायतींचे निवडणूक निकाल हाती आल्यानंतर ए. आनंदवल्ली फारच भावूक झाल्या. विजयानंतर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या की, पक्षांनी मला संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. ही बाब केवळ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातच घडू शकते. पक्षाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबाबत मी पक्षाची ऋणी राहीन, असे त्यांनी सांगितले. ए. आनंदवल्ली यांचे कुटुंबीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी निगडीत आहेत. सन 2011 मध्ये ए. आनंदवल्ली या पठाणपूरम पंचायत कार्यालयात सफाई कर्मचारी म्हणून रुजू झाल्या होत्या.