ग्रामसभेला अधिकार्‍यांची दांडी

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – गावच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामसभेला अन्यसाधारण महत्त्व असून यामध्ये घेतलेल्या निर्णयाला कुठेही आव्हान नाही. गावच्या दृष्टीने अनेकविविध उपक्रम ग्रामसभेत चर्चेला येतात म्हणून यात गावच्या विकासासंदर्भात आवश्यक असलेल्या विभागाचे अधिकारी किंवा प्रतिनिधी उपस्थित असणे आवश्यक आहे परंतु अलिकडे बहुतेक सर्व अधिकारी हेतुपुरस्सर अनुपस्थित असतात त्यावर शासनाने कडक पावले उचलून संबंधित अधिकार्यांवर कारवाई केली पाहिजे असा सुर उमटू लागला आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा हा ग्रामीण भारत आहे. त्यामुळे गावचा विकास होण्यासाठी गावाशी संबंधित सर्व सेवा योग्य प्रमाणात मिळाल्या पाहिजेत त्यासाठी महसूल, पोलिस, विज, कृषी, वन यांचे प्रतिनिधी ग्रामसभेस उपस्थित असणे आवश्यक आहे. परंतु बहुतेक गावात ग्रामसभा केवळ ग्रामसेवक हाताळताना दिसतात. त्यामुळे गावच्या विकासासंदर्भात अनेक प्रश्नांची उकल होत नाही. यावर जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून संबंधित अधिकार्‍यांना याबद्दल विचारणा करुन कारवाई करण्याची गरज आहे कारण बहुतेक अधिकारी उदासीनता दाखवत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायत प्रत्येक विभागाला सभेची नोटीस पाठवते.

ग्रामसभेच्या ठरावाशिवाय कोणत्याही विकास कामास मंजूरी मिळू शकत नाही. पंचायत राज प्रणालीमधे ग्रामसभा महत्वाची भूमीका पार पाडते.