3000 रुपयाची लाच घेताना परिरक्षण भूमापक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन –  शासकीय कामासाठी घराचा नकाशा आणि उतारा देण्यासाठी तीन हजार रुपयाची लाच घेताना निफाड तालुक्यातील सायखेडा येथील नगर भूमापन कार्यालयातील परिरक्षण अधिकाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी (दि. 21) नगर भूमापन कार्यालय सायखेडा येथे करण्यात आली. अनिल हरीभाऊ शेळके असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे.

याप्रकरणी तक्रारदार यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारदार यांनी शासकीय कामासाठी त्यांच्या घराचा नकाशा आणि उतारा मिळण्यासाठी अनिल शेळके यांच्याकडे अर्ज केला होता. उतारा आणि नकाशा देण्यासाठी शेळके याने तक्रारदार यांच्याकडे 5 हजार रुपयाची लाच मागितली. तडजोडीमध्ये तीन हजार देण्याचे ठरले होते.

तक्रारदार यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर अधिकाऱ्यांनी पडताळणी केली. त्यावेळी अनिल शेळके याने तक्रारदार यांच्याकडे 5 हजार रुपयांची लाच मागून 3 हजार स्विकारण्याचे कबुल केल्याचे निष्पन्न झाले. आज नगर भूमापन कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून लाच स्विकारताना अनिल शेळके याला रंगेहाथ पकडण्यात आले.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.