दिल्लीतील हॉटेलमधील आगीत महाराष्ट्रातील अधिकाऱ्याचा मृत्यू

दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – करोल बागमधील हॉटेलमधील अग्नितांडवामध्ये नवी दिल्लीत कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील अक्कलकोट य़ेथील अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील करोल बाग येथील चार मजली अर्पित पॅलेस हॉटेलमध्ये मंगळवारी पहाटे भीषण आग लागली होती. या घटनेत १७ जण ठार झाले तर ३५ जण जखमी झाले आहेत.

राहूल एस. शाखापुरे असे मृत झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. शाखापुरे केंद्र सरकारच्या आरोग्य सेवा संचलनालयात मागील दहा वर्षांपासून केंद्रीय औषध मानक गुणवत्ता नियंत्रण संचलनालयात ते कार्यरत होते. सोमवारी ते हॉटेल अर्पित पॅलेसमध्ये थांबले होते. त्यावेळी अचानक आग लागल्याने त्यांचा बळी गेला. त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय औषध मानक गुणवत्ता नियंत्रण संचलनायाचे महासंचालक डॉ. ई. ईश्वरा रेड्डी यांनी अक्कलकोट येथील त्यांच्या कुटुंबियांना दिली. त्यानंतर अक्कलकोटमध्ये शोककळा पसरली आहे.

दिल्लीतील करोलबाग येथे असलेल्या चार मजली अर्पित पॅलेस हॉटेलमध्ये मंगळवारी पहाटेच्या सुमारास आग लागली. जीव वाचविण्यासाठी तिघांनी हॉटेलमधून उड्या मारल्या. त्यात एका लहान मुलाचाही समावेश आहे. या घटनेत एकूण १७ जण ठार झाले तर ३५ जण जखमी झाले आहेत. शॉर्टसर्किटमुळे हॉटेलमध्ये आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.