दुय्यम निबंधक कार्यालय आजपण बंद ; साडे सतरा कोटीचा महसूल बुडाला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – येथील सर्व दुय्यम निबंधक कार्यालय इलेक्शन ड्युटी ट्रेनिंगसाठी बंद ठेवली गेली आहेत. याचा फटका नागरिकांना बसला. सुमारे साडे सतरा कोटी रुपयांचा महसूलही बुडाला.

महाराष्ट्र शासनाच्या १९९६ च्या परिपत्रकान्वये जी कार्यालये सामान्य नागरिकांशी निगडित आहेत आणि ज्या कार्यालयाकडून महसूल जमा होतो, असे कार्यालय बंद ठेवता येत नाहीत. त्याचप्रमाणे सदर कार्यालयातील कर्मचारी यांना इलेक्शन ड्युटी देण्यात येऊ नये असे स्पष्ट केले आहे. तरीही येथील कर्मचाऱ्यांना निवडणूक कार्यक्रमात घेण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

पुणे शहरातील २० दुय्यम निबंधक कार्यालय पूर्णपणे इलेक्शन ड्युटीसाठी बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे येणाऱ्या पक्षकारांचे आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रासाचे बळी ठरले आहेत. शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूलही बुडालेला आहे.

या बंद विषयी पक्षकारांना कोणतीही सूचना महसूल विभागाकडून देण्यात आलेली नाही. अचानकपणे सर्व कार्यालये बंद केली गेली असे ऍड. अमोल काजळे पाटील यांनी सांगितले. याचा कन्व्हेंसिंग प्रॅक्टिशनर असोसिएशनतर्फे निषेध व्यक्त केला. निर्णयामुळे महाराष्ट्र शासनाचे प्रत्येक दिवसाचे अंदाजे १६ कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी व एक कोटी ५० लाख रुपये नोंदणी फीचे आर्थिक नुकसान झाले आहे असा दावा ही त्यांनी केला.