10 वी – 12 वी च्या परीक्षा ‘ऑफलाईन’च ! 23 एप्रिलनंतर होणार परीक्षा

सोलापूर : 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी असते. दुसरीकडे त्यांच्या विषयांची संख्याही जास्त असल्याने ऑनलाइन परीक्षा घेणे अशक्य आहे. या परीक्षांचे वेळापत्रक ठरविण्यासंदर्भात लवकरच बैठक घेतली जाणार आहे, असे पुणे बोर्डाच्या अध्यक्षा अर्चना काळे यांनी म्हटले आहे. बहुपर्यायी प्रश्नपत्रिकांद्वारे परीक्षा घेणेही विद्यार्थ्याच्या हिताचे नाही. शिवाय मे महिन्यातील उन्हाळा आणि जूनमधील पावसाळ्याचा अनुभव पाहता ही परीक्षा ऑफलाईनच घेतली जाणार आहे. यासाठी 23 एप्रिलनंतर परीक्षा घेण्याच्या दृष्टीने विचार केला जात आहे.

10 वी वर्गासाठी एकूण 64 हून अधिक विषय असतात तर 12 वीच्या वर्गासाठी विविध फॅकल्टीचे 128 विषय असतात. त्यामुळे ऑनलाइन परीक्षा अशक्य आहे. त्यातच 10 वी- 12 वीच्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने ऑफलाईनच परीक्षा होणार आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करुन परीक्षा केंद्रांवरच परीक्षा घेतली जाईल. कोरोनाचे नियम पाळायचे असल्याने यासाठी केंद्रे वाढीची शक्यता आहे.

10 वी- 12 वीची बोर्डाची परीक्षा नेहमी फेब्रुवारी- मार्चपासून सुरु होते. परंतु, कोरोनाच्या स्थितीमुळे यावर्षी 15 जूनऐवजी 23 नोव्हेंबरपासून काही ठिकाणी 9 वी ते 12 वीचे वर्ग सुरु झाले. कोरोनामुळे शाळांनी जूनपासूनच ऑनलाइन वर्ग सुरू केले होते. पण ऑनलाइन शिक्षणाच्या मयार्दा यामध्ये अडथळा ठरत असल्याचे म्हटले जात आहे. 23 एप्रिलपर्यंत हे वर्ग सुरु राहणार आहेत. यानंतर परीक्षा घेण्याचे नियोजन सुरु झाले आहे.

9 वी ते 12 वीचे जे विद्यार्थी शाळेत येत नाहीत त्यांना गुगल मिटद्वारे ऑनलाइन शिक्षण देण्याचे नियोजनही केले आहे. 23 एप्रिलपर्यंत किमान 70 टक्के अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा शाळांचा प्रयत्न आहे. यासाठी शिक्षकांना नियोजन करण्यास सांगण्यात आले आहे.

राज्यात 9 वी ते 12 वीपर्यंतच्या 25 हजार 866 पैकी अवघ्या साडेनऊ हजार शाळा सुरु झाल्या आहेत. तर 59 लाख 27 हजार 456 पैकी फक्त सुमारे 4 लाख विद्यार्थी शाळेत येत आहेत. यामध्ये 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांची संख्याच जास्त आहे. त्यामुळे आता एक ते दीड महिना उशिराने 10वी- 12वीची परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. जानेवारी महिन्यात वेळापत्रक जाहीर केले जाईल, अशीही माहिती बोर्डाने दिली आहे.

You might also like