अरे बापरे ! महसूलमंत्र्यांच्या बंगल्यातच एकाचा जाळून घेण्याचा प्रयत्न

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या बंगल्यातच आत्महत्येचा प्रयत्न झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकाने अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. पोलीस वेळेत पोहाेचल्यामुळे त्यांनी त्या व्यक्तीस आत्महत्या करण्यापासून रोखले. काल मंगळवारी दुपारी ही घटना घडली.

या प्रकरणी गावदेवी पोलिसांनी पांडुरंग वाघ यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे. त्यांना अटक केली आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या अल्टामाउट रोडवरील, राॅयल स्टोन बंगल्यात हा प्रकार घडला. अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला जाळून घेणार, तो वेळीच पोलिसांनी त्याला अडवलं, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. वाघ हे अहमदनगरच्या नेवासा येथील झापडी गावचे रहिवाशी आहेत. वाघ यांनी सनदशीर मार्गाचा अवलंब न करता सरकारला वेठीस धरण्याच्या हेतूने बंगल्यातील विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात अचानक अंगावर पेट्रोल ओतून घेत, स्वत:ला पेटवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवून आत्महत्या करण्यापासून रोखले. वाघ यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.

शासनाकडून २०१८ मध्ये वाघ यांनी शासनमिश्रित वाळू उत्खनन व वाहतुकीचा परवाना मिळवला होता. त्यासाठी त्यांनी सरकारकडे ८ लाख ७२ हजार भरले होते. मात्र, स्थानकाच्या विरोधामुळे वाळूउपसा झाला नाही. त्यामुळे पैसे परत मिळावेत म्हणून वाघ आले होते.