कच्च्या तेलाच्या किंमतीत ऐतिहासिक घसरण’, ‘बाटलीबंद’ पाण्यापेक्षाही झालं ‘स्वस्त’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे कच्च्या तेलाच्या किंमती मोठ्या प्रमाणात घसरल्या आहेत. न्यूयॉर्कमध्ये कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण नोंदविली गेली. 20 एप्रिल रोजी न्यूयॉर्क ऑइल मार्केटमध्ये अनागोंदी दिसून आली, इथं तेलाच्या किंमती इतक्या खाली आल्या की बाटलीबंद पाण्यापेक्षा कच्चे तेल स्वस्त झाले. दरम्यान, कच्च्या तेलाच्या किंमतीतील घट मे महिन्यात होणाऱ्या पुरवठ्यासाठी आहे. तसेच अमेरिकेचा बेंचमार्क विक्रमी पातळीवर घसरला आणि मे महिन्यासाठी तेलाचे दर प्रति बॅरल 1.50 डॉलरच्या खाली आले. एका दिवसात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये ही 90 टक्क्यांची घसरण होती.

मे महिन्यात किमतीत घसरण
दरम्यान, मे महिन्यात कच्च्या तेलाच्या पुरवठ्याचे कंत्राट 21 एप्रिल रोजी संपणार आहे, परंतु तेलाचे खरेदीदार मिळत नाहीत. कारण जगाची मोठी लोकसंख्या सध्या घरात बंदिस्त आहे आणि जगातील बरेच देश तेलाचा वापर करीत नाहीत. व्यापार सत्रात, बाजारात किंमतींमध्ये आणखी घसरण सुरू आहे. सोमवारी न्यूयॉर्कमधील यूएस बेंचमार्क वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटमध्ये कच्च्या तेलाचे करार 301.97 टक्क्यांनी घसरले आणि ते प्रति बॅरल -36.90 डॉलरवर थांबले. मेमध्ये पुरविल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल जास्तीत जास्त 17.85 डॉलर्स आणि किमान -37.63 डॉलर्स होते. बाजार अखेर प्रति बॅरल – 37.63 वर बंद झाला. न्यूयॉर्कमध्ये प्रथमच क्रूड तेलाच्या किंमती नकारात्मक झाल्या आहेत.

कच्च्या तेलाच्या किंमती खाली येण्याचा अर्थ असा नाही की आज किंवा कालपासूनच तेल स्वस्त झाले आहे. दरम्यान, मे महिन्यात कच्च्या तेलाच्या पुरवठ्यासाठी जे करार दिले जातात, ते आता नकारात्मक झाले आहेत. तेल विक्रेते जगातील देशांना तेल खरेदी करण्यास सांगत आहेत, परंतु तेल खर्च करणार्‍या देशांना याची गरज नाही, कारण त्यांची कोट्यवधी लोकसंख्या घरात बसली आहे. त्यांचे तेलाचे साठे भरलेले आहेत, जुने तेल वापरले न गेल्याने त्यांच्याकडे नवीन तेल साठवण्याची जागा नाही. म्हणून ते तेल खरेदी करीत नाहीत.