ठाणे: Ola Driver Murder Thane | ओला चालकाच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना भिवंडीत घडली आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भिवंडी तालुक्यातील पाइपलाईनलगतच्या झाडाझुडपात ओला चालकाचा मृतदेह आढळून आला आहे. अक्रम इकबाल कुरेशी (वय-२२, रा. जोगेश्वरी, मुंबई) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्रम कुरेशी हा मुंबई शहरातील जोगेश्वरी भागात आपल्या कुटुंबासह राहत होता. तो मूळचा उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्याचा रहिवाशी होता. अक्रम हा नेहमीप्रमाणे (दि.१७) सकाळच्या सुमारास ओला कार घेऊन घराबाहेर पडला. दुपारपर्यंत तो कुटुंबाच्या संपर्क होता. मात्र, दुपारनंतर त्याचा मोबाईल बंद झाला.
त्यानंतर जीपीएसच्या मदतीने अक्रमचे लोकेशन शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचे शेवटचे लोकेशन भांडुप परिसरात दिसून आले. परंतु, त्यानंतर त्याचे लोकेशन दिसत नसल्याने मध्यरात्री ओशिवरा पोलीस ठाण्यात अक्रम बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीनुसार पोलीस शोध घेत असताना अक्रमचा मृतदेह दगडाने ठेचलेल्या अवस्थेत तानसा- वैतरणा पाइपलाइन लगतच्या झाडाझुडपात आढळून आला.
या घटनेची माहिती मिळताच (दि.१८) सकाळी पोलीस घटनास्थळी पोहोचले. सदर मृतदेह अक्रमचाच असल्याची खात्री पटल्यानंतर पंचनामा करून शवविच्छेदनासाठी भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. अक्रमचा भाऊ खुशिद आलम इकबालुद्दीन कुरेशी (वय-२८) यांच्या तक्रारीवरुन भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.