इंडोनेशियामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक, सुनामीचाही कहर : आतापर्यंत ४३ जणांचा मृत्यू तर ६०० जण जखमी

जकार्ता : वृत्तसंस्था – इंडोनेशियामध्ये पुन्हा एकदा सुनामी आली आहे. या सुनामीमध्ये आतापर्यंत ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६०० हून अधिक जण जखमी आहेत. इंडोनेशियामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानेच ही सुनामी आल्याची माहिती इंडोनेशियाच्या अधिकाºयांना दिली आहे. जावाचा दक्षिणी भाग आणि दक्षिणी सुमात्राच्या किनाऱ्यावरील आलेल्या या सुनामीने डझनांहून अधिक इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या आहेत. ही सुनामी स्थानिक वेळेनुसार शनिवारी रात्री साडेनऊ वाजता आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रवक्ते सुतोपो पूर्वो नुग्रोहो यांनी दिली आहे.

या सुनामीमध्ये आतापर्यंत ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६००हून अधिक लोक जखमी आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याने समुद्राच्या आत भूस्खलन झाले आणि लाटा मोठ्या प्रमाणात उसळल्या. त्यानंतर या लाटांनी सुनामीचे स्वरूप धारण केले. इंडोनेशियातील भूवैज्ञानिकांनी या सुनामीच्या कारणांचा शोध सुरू केला आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही नुग्रोहो यांनी व्यक्त केली आहे. अनक क्रॅकटो हे छोटे ज्वालामुखीचे बेट आहे. १८८३ मध्ये क्रॅकटो ज्वालामुखीच्या विस्फोटामुळे हे बेट अस्तित्वात आले.

गेल्या काही दिवसांपूर्वीही इंडोनेशियाला अशाच भूकंपाचा जोरदार धक्का बसून त्यापाठोपाठ सुनामी आली होती. त्या सुनामीमुळे इंडोनेशियामध्ये १७६३ जणांचा मृत्यू झाला होता. अनेक लोक बेपत्ता होते. सुलावेसी बेट परिसरात २८ सप्टेंबर रोजी ७़५ रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप झाला व सुनामीचेही संकट ओढावले. याचा मोठा फटका पालू-पेटोबो व बालारोआ या दोन भागांना बसला. तेथील इमारती कोसळून त्याच्या ढिगाºयाखाली कित्येक लोक दबले गेले होते. त्यातील अनेकांची बचावपथकांनी सुखरूप सुटका केली; परंतु तरीही अद्याप ५ हजार जण बेपत्ता होते.