पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरील ब्रिटीशकालीन पुल कोसळला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – मावळ तालुक्यातील तलेगाव आणि आंबी गावांना जोडणारा ब्रिटीशकालीन जुना पुल सोमवारी पहाटे कोसळला. ही घटना सोमवारी सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास घडली. एमआयडीसीच्या कामगारांना घेऊन जाणाऱ्या बसने पुल ओलांडल्यानंतर काही क्षणात हा पुल कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

हा पुल जुना व कमकुवत झाल्याने गेल्या ५ वर्षांपासून तो अवजड वाहनांच्या वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता. तळेगावकडून एमआयडीसीत जाण्यासाठी हा सर्वात जुना मार्ग आहे. सर्वात जवळचा मार्ग म्हणून वाहनचालक या पुलाचा वापर करीत होते. सोमवारी सकाळी पहिल्या पाळीच्या कामगारांना घेऊन जाणाऱ्या १० ते १२ बसगाड्या या पुलावरुन गेल्या. त्यानंतर कोणीही नसताना या पुलाचा मधला भाग कोसळला. पुलावर कोणी नसताना दिवसा उजेडात हा पुल कोसळल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

रात्री पूल कोसळला असता तर हा प्रकार कोणाच्या लक्षात आले नसते. त्यानंतर पहाटे या पुलावरुन वाहतूक सुरु झाली असती तर धुक्यामुळे पुलावर येणाऱ्या वाहनांना पुलाचा मधला भाग कोसळला हे लक्षात येण्यास खूप वेळ गेला असता व पुलावरुन अनेक वाहने थेट नदीत कोसळली असती. सुदैवाने पहाटे पुल कोसळल्यामुळे लोकांच्या लक्षात हा प्रकार आला. गेल्या वर्षी पावसाळ्यात रात्री कोकणातील सावित्री नदीवरील पुल मध्यरात्रीच्या सुमारास कोसळला होता. त्यात पुलावरील काही वाहने थेट पूर आलेल्या नदीत कोसळली होती.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/